कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता नागरिकांनी गाफिल राहू नये

0
85

ब्रेक द चेन’ अंतर्गत निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. परंतू कोरोनाचा धोका अजूनही गेलेला नाही त्यामुळे कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता नागरिकांनी गाफिल राहू नये व जास्तीत जास्त दक्षता घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले. वाढती गर्दी लक्षात घेता शनिवार, रविवारचे निर्बंध कडक करण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शहरी भागात निर्बंध शिथिल केल्यानंतर गर्दी वाढू लागली आहे. पुढील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. या आठवड्यात जिल्ह्यातील कोरोनाचा रुग्ण दर कमी होतांना दिसत आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता  सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत असल्याचे दिसत आहे. नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडावे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट विचारात घेऊन प्रशासकीय यंत्रणेने संभाव्य तयारी केली असली तरी नागरिकांनी आवश्यक त्या नियमांचे पालन केलेच पाहिजे.

पोलीस प्रशासनाने वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचेही श्री.पवार यांनी सांगून तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता आयएलआय आणि सारी रुग्णांचे नियमित सर्वेक्षण, सुपर स्प्रेडर्स वर अधिक लक्ष, हॉटस्पॉट मध्ये रॅपिड अँटीजेन टेस्ट वाढवणे, दुसऱ्या लाटेमध्ये वाढवलेल इन्फ्रास्ट्रक्चर तसेच ठेवणे, सर्व डीसीएच मध्ये 10 टक्के बेड्स लहान मुलांसाठी राखीव ठेवणे, सर्व रुग्णालयात ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था सुनिश्चित करणे. तसेच तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने लोक शिक्षण व जनजागृती करण्यात येत आहे. केंद्र सरकार कडून लस पुरवठा मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर जिल्ह्यात रोज दिड लाख नागरिकांचे लसीकरण करण्याच्या दृष्टीने नियोजन झाल्याचेही श्री. पवार यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात कमीत कमी एक तरी ऑसिजन प्लांट लवकरात लवकर कार्यान्वित करावा. सध्या जिल्ह्यात 15 ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित असून 39 ऑक्सिजन जनरेशन प्लांट चे काम प्रगतीपथावर आहे. ग्रामीण भागात ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी तयारी केली आहे. अवसरी येथील शिवनेरी जम्बो कोविड रुग्णालय नुकतेच कार्यान्वित केले आहे. ग्रामीण रुग्णालय वेल्हे येथे लहान मुलांन करीता स्वतंत्र कक्ष कार्यान्वित. संभाव्य कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने ग्रामीण भागात सीएचओ, आशा वर्कर्स, एएनएम, अंगणवाडी सेविका, आरोग्य सहायक यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरु आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना असलेला धोका लक्षात घेता प्रत्येक तालुक्यात प्रशिक्षित बालरोग तज्ञ नियुक्त करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरु आहे. जिल्ह्यात म्युकरमायकोसीस रुग्णांकडे विशेष लक्ष देण्यासाठी प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच म्युकरमायकोसिस बाबत शासनाने तयार केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here