‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’, ‘मी जबाबदार’ या योजनेप्रमाणे कोरोनामुक्त गाव योजनेकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष केंद्रीत करावे. छोटी छोटी जबाबदारी स्वीकारून सांघिकप्रमाणे जिल्हा कोरोना मुक्त करण्याचे मोठे काम करावे. आरोग्य सुविधा बळकट करणे याला प्राधान्य देत आहोत. भविष्यातील पुढची लाट आलीच तर त्यासाठी ऑक्सिजनची क्षमता वाढवणं, आरोग्य सुविधा वाढवणं, चाचण्यांची क्षमता वाढवणं याचे नियोजन आतापासूनच करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
कुडाळ एम.आय.डी.सी. येथे अवघ्या 15 दिवसात बसवण्यात आलेल्या युनायटेड एअर गॅस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी निर्मित 6 के.एल. क्षमतेच्या लिक्विड ऑक्सिजन रिफिल प्लांटचे ऑनलाईन लोकार्पण मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते आज झाले. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर हे ऑनलाईन सहभागी झाले होते. तसेच खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, सहायक जिल्हाधिकारी संजितe मोहोपात्रा, एमआयडीसीचे क्षेत्रीय संचालक अविनाश रेवणकर, जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब, युनायटेड एअर गॅस कंपनीचे अतुल नलावडे, अमोल नलावडे, सचिन आम्रे, संजय पडते, संदेश पारकर, अमित सामंत आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, कोकणच्या किनाऱ्यावर नेहमीच नैसर्गिक संकटे येत असतात. पाऊस, कधी अतिवृष्टी तर कधी चक्रीवादळ अशा संकटांबरोबरच कोविडचाही मुकाबला करत आहात. केवळ मुकाबला न करता एक एक पाऊले पुढे टाकत आहात. तोही आगदी आत्मविश्वासाने. त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून कौतुक करतो. पुढच्या संकटाची गंभीरता कमी करण्यासाठी तजवीज करणं आणि त्याचबरोबर संकट येणारच नाही त्यासाठी ही नियोजन करणं हे महत्वाचं आहे. सद्याच्या प्लांटची क्षमता 20 के.एल पर्यंत वाढवावी. त्याचबरोबर मागील अनुभव पाहता जिल्ह्याला भासलेल्या ऑक्सिजनची आवश्यकता पाहून तशी तरतूद करून ठेवा. राज्याची आरोग्य सुविधा बळकट करणं याला प्राधान्य देत आहोत. शासनाकडून आवश्यक ती सुविधा जिल्ह्याला दिली जाईल. जिल्ह्यामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा पडता कामा नये. त्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी प्लांट उभे करा. लोकप्रतिनिधींनी मतदार यादीप्रमाणे कोरोनामुक्तीसाठी काम करावे. सर्व प्रथम ‘माझे घर कोरोना मुक्त’ यावर भर द्या. कोरोनाचे संकट मुळापासून उपटून फेकायचे आहे. त्यासाठी आतापासूनच जिल्ह्याच्या आरोग्य सुविधांची क्षमता वाढवण्यासाठी नियोजन करा. ज्याप्रमाणे विक्रमी वेळेत ऑक्सिजन प्लांट उभा केला. तसाच जिल्हाही कोरोना मुक्त करून राज्याला दिशा दाखवावी, अशी अपेक्षाही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी व्यक्त केली.
पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, जिल्ह्यामध्ये 22 अद्ययावत रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. मॉड्युलर ओटीची संकल्पना घेऊन सिंधुदुर्ग, सावंतवाडी, कणकवली, कुडाळ या 4 ठिकाणी त्याची उभारणी करण्यात येणार आहेत. ऑक्सिजनमध्ये जिल्ह्याला स्वयंपूर्ण करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी दोन ऑक्सिजन प्लांट उभे केले आहेत. सावंतवाडी आणि कणकवलीला देखील ऑक्सिजनचे प्लांट उभे करतोय. तालुक्याच्या ठिकाणीही ऑक्सिजन प्लांट असावा, असा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. काही ठिकाणी जिल्हा नियोजनमधून प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. 565 ऑक्सिजन बेड आहेत. त्यामध्ये वाढ करून 1 हजार पर्यंत करतोय. तिसऱ्या लाटेला सामोरे जाताना आवश्यक ती सुविधा, साधन सामग्रीसह उभी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सारस्वत बॅँक, काही उद्योजक, काही स्वयंसेवी संस्था यांनीही सीएसआर फंडामधून योगदान दिले आहे. खासदार विनायर राऊत म्हणाले, आपण जाहीर केलेल्या मिशन ऑक्सिजन अंतर्गत अवघ्या 15 दिवसात 6 के.एल चा प्लांट उभा राहीला. यासाठी एमआयडीसीसह गतीमान प्रशासनाचे कौतुक करतो. आमदार वैभव नाईक यांनीही यावेळी या प्लांटमुळे ऑक्सिजनची गैरसोय दूर होईल, असे सांगून लसीकरणाचे डोस वाढवून द्यावेत, अशी मागणी केली. आमदार दीपक केसरकर यांनी वेंगुर्ला रुग्णालयाचे उद्घाटन ही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी स्वागत प्रास्ताविक करत ऑक्सिजन प्लांट उभारणीबाबतची सविस्तर माहिती दिली. प्लांट उभारणीबाबतची छोटी चित्रफित दाखविण्यात आली. मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगन हे ऑनलाईन सहभागी झाले होते. प्रांताधिकारी वंदना खरमाळे, तहसिलदार अमोल पाठक आदी उपस्थित होते.