‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ अशी बिरूदावली मिरवणारी आणि ग्रामीण भागाचा आर्थिक कणा असलेली लालपरी
कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूची लागण होऊन मृत्युमुखी पडलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी मोठा दिलासा दिला आहे. मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी महामंडळ ठामपणे उभे असून कोरोनामुळे निधन झालेल्या, परंतु शासनाच्या निकषात बसत नाहीत, अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना राज्य परिवहन महामंडळाच्या निकषाप्रमाणे ५ लाख रूपयांची मदत देण्यात येईल, अशी घोषणा मंत्री ॲड. परब यांनी केली. त्याशिवाय कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना ५० लाख रूपये देण्याची सरकारी योजनेची मुदत एसटी कर्मचाऱ्यांसाठीही ३० जून २०२१ पर्यंत वाढिवण्यात आल्याचे त्यांनी जाहिर केले.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर संबंधित व्यक्तीच्या कुटुंबियांना ५० लाख रूपये देण्याची राज्य सरकारने योजना घोषित केली होती. सरकारची ही योजना गेल्यावर्षी महामंडळाच्या वर्धापनदिनी एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठीही लागू केली होती. या योजनेची मुदत ३० डिसेंबरपर्यंत होती. मात्र, शासनाने या योजनेचा कालावधी नंतर ३० जूनपर्यंत वाढवला. परंतु, राज्य परिवहन महामंडळाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी या योजनेचा कालावधी वाढवला नव्हता. त्यामुळे वर्धापनदिनाचे औचित्य साधत मंत्री, ॲड. परब यांनी हा कालावधी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी देखील ३० जून २०२१ पर्यंत वाढविला असल्याचे घोषित केले. मात्र, कोरोनामध्ये ज्यांचा मृत्यू झाला आहे, जे निकषात बसत असतील त्यांना महाराष्ट्र शासनाच्या नियमांप्रमाणे मदत दिली जाईल. मात्र, कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे, परंतु जे शासनाच्या निकषात बसत नाहीत, अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना राज्य परिवहन महामंडळाच्या निकषाप्रमाणे ५ लाख रूपयांची मदत देण्याचे ॲड. परब यांनी जाहिर केले.
कोरोना काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी कोरोना वॉरियर्स म्हणून एसटीचा कर्मचारी वर्ग रस्त्यावर उतरला होता. मात्र, एसटीच्या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण होऊन त्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांचा कोरोना किंवा अन्य कारणांमुळे मृत्यू झाला आहे, अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना येत्या सहा महिन्यांमध्ये अनुकंपातत्वावर सेवेत सामावून घ्यावे, असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी यावेळी प्रशासनाला दिले.
खासगी वाहतूकीच्या तुलनेत किफायतशीर दर असल्याने एसटीची ’महाकार्गो’ ही मालवाहतूक सेवा उपयुक्त ठरू लागली आहे. मालवाहतूक करताना चालकांना अनेकदा परगावी जावे लागते. तेथे त्यांना अनेकदा मुक्काम करावा लागतो. अशावेळी त्यांना पदरमोड करून आपला खर्च भागवावा लागतो. त्यामुळे अशा चालकांना परगावी मुक्काम करावा लागल्यास त्यांना सरसकट १५० रूपये प्रतिदिन भत्ता देण्याची घोषणा मंत्री, अॅड, परब यांनी केली. त्यामुळे या चालकांची ओढाताण होणार नाही, याची काळजी महामंडळ आजपासून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.