पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात कोरोनाविरुद्धची लढाई मजबूत करण्यासाठी क्रॅश कोर्सची सुरुवात केली आहे. त्याचा उद्देश प्रशिक्षण देऊन देशात एक लाख कोरोना योद्धे तयार करणे हा आहे.
कोरोनाशी लढत असलेल्या सध्याच्या आरोग्यव्यवस्थेला सहकार्य देण्यासाठी क्रॅश कोर्सद्वारे एक लाख युवकांना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे कोर्स होम केअर सपोर्ट, बेसिक केअर सपोर्ट, अॅडव्हान्स केअर सपोर्ट, इमर्जन्सी केअर सपोर्ट, सॅम्पल कलेक्शन सपोर्ट आणि मेडिकल इक्विपमेंट सपोर्टवर आधारित असतील. ते दोन-तीन महिन्यांतच विशेष प्रशिक्षण देऊन हे कोर्स पूर्ण करता येतील. त्यामुळे हे लोक त्वरित काम करण्यासाठी उपलब्धही होऊ शकनार आहेत.
देशातील २६ राज्यांच्या १११ प्रशिक्षण केंद्रांत या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे.पंतप्रधान मोदींनी या वेळी फ्रंटलाइन वर्कर्सना व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित केले.ते म्हणाले, ‘सहा नवे क्रॅश कोर्स सुरू केले जात आहेत. त्यामुळे देशात एक लाखापेक्षा जास्त प्रशिक्षित कोरोना योद्धे तयार होतील. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपल्याला तयारी आणखी वाढवावी लागेल. कोरोना आपले रंग-रूप बदलण्याची शक्यता कायम आहे. त्यामुळे आपल्याला सज्ज राहावे लागेल.’
त्याशिवाय मोदीजींनी केंद्र सरकार २१ जूनपासून सर्वांना मोफत लस देण्यासाठी वचनबद्ध आहे. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान ऑक्सिजनची टंचाई जाणवली होती. त्यामुळे आता देशभरात १,५०० पेक्षा जास्त ऑक्सिजन प्रकल्प स्थापन करण्यासाठी युद्धस्तरावर काम सुरू असल्याचेहि सांगितले.