कोरोना: लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या सर्वसामान्य नागरिकांना १५ ऑगस्टपासून उपनगरीय रेल्वेतून प्रवास करण्यास मुभा

0
96

ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरा डोस घेऊन १४ दिवस झाले असतील त्यांना १५ ऑगस्ट २०२१ पासून उपनगरीय रेल्वेमधून प्रवास करण्यास मुभा देण्यात येत असल्याची घोषणा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी सात दिवसांवर येऊन ठेपलेल्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतांना नागरिकांनी संयम बाळगावा, गर्दी करू नये, कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून कोरोनाला हरवण्याची जिद्द मनात कायम ठेवावी असे आवाहन केले.

फोटो पासेसवर क्यु आर कोड

ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत असे प्रवासी रेल्वेचा पास ॲपवरून डाऊनलोड करू शकतील आणि ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही असे प्रवासी शहरातील पालिकेच्या प्रभाग कार्यालयातून तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांमधून फोटो पासेस घेऊ शकतील. या लोकल प्रवासाच्या पासेसवर क्यू आर कोड असतील असेही ते म्हणाले.

राज्यात ४ कोटी ६३ लाख ७६ हजार नागरिकांना लसीचे डोस देण्यात आले. यामध्ये पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ३ कोटी ४५ लाख ३० हजार ७१९ आहे तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या १ कोटी १८ लाख ४६ हजार १०७ आहे. पहिला डोस देण्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. राज्याची लसीकरण क्षमता फार मोठी आहे आपण एका दिवसात आठ ते दहा लाख नागरिकांचे लसीकरण करू शकतो परंतु लसीची मर्यादित उपलब्धता लक्षात घेता आज घडीला मास्क हाच आपला खरा संरक्षक असल्याचेही  ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here