कोरोना संसर्ग संपूर्णपणे रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक नियमांची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे. नियम न पाळणाऱ्यांवर काटेकोर कारवाई करावी. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणांनी नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध अधिक कडकपणे कारवाया करण्याचे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याबाबतची दक्षता घेण्यासोबतच मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व इतर दक्षता नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले
जिल्ह्यातील पर्यटनाच्या ठिकाणी गर्दी केली जात आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढत आहे. त्यामुळे अशा ठिकाणी कोरोनाबाबच्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करावी, कोणत्याही परिस्थितीत नियम पाळलेच पाहिजेत, सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन होणे हे सर्वांच्याच हिताचेच आहे असे त्यांनी सांगितले.
निष्कारण घराबाहेर पडणाऱ्या व्यक्ती, मास्क न वापरणारे, सुरक्षित अंतराचे पालन न करणारे यांच्यावर वेळीच कारवाई झाली पाहिजे, अशी कारवाई सतत व नियमितपणे करावी. पोलीस आणि प्रशासनाने कुठेही गर्दी होणार नाही आणि व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर राहील हे पाहिलेच पाहिजे. पुणे जिल्ह्यात मृत्यूदर कमी झाला आहे. मात्र नागरिकांनी मास्क वापरण्याची नितांत गरज आहे. कोरोनाचे दोन्ही डोस घेतले तरी सॅनिटायझर, सुरक्षित अंतर याबाबतही दक्षता घ्यावीच लागणार आहे, त्यामुळे प्रत्येकाने शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, कोणत्याही परिस्थितीत नियमांची कडक अंमलबजावणी केली पाहिजे. नियमांच्या अंमलबजावणीत जराही कुचराई होता कामा नये, असे स्पष्ट निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले.