कोल्हापूर जिल्हा ‘कोरोना मुक्त’ करण्यासाठी निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
66

कोल्हापूर जिल्हा ‘कोरोना मुक्त’ करण्यासाठी निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा, अशा सूचना देऊन जिल्ह्यात उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक तेवढा निधी राज्य शासन उपलब्ध करुन देईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगितले.

 राज्यात कोल्हापूर जिल्ह्याचा कोरोना रुग्ण व मृत्यूदर अधिक आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नमुना तपासण्यांची संख्या वाढवा. विशेषत: कोरोनाबाधित रुग्ण अधिक असणाऱ्या गावांमधील सर्व नागरिकांच्या तपासण्या करुन घ्या. तसेच बाधित रुग्णांकडून संसर्ग फैलावू नये, यासाठी संस्थात्मक अलगीकरण प्रभावीपणे करा. तसेच याठिकाणी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्या. जिल्ह्यातील दिव्यांगांचे लसीकरण प्राधान्याने पूर्ण करा असे सांगून ते म्हणाले, कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्नशील असून ग्रामविकास, आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागातील रिक्त पदभरती तात्काळ भरण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. सीपीआर, इंदिरा गांधी रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी निधी तसेच डोंगराळ भागासाठी रुग्णवाहिका देण्यात येतील. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत उपचार देण्यात येत आहेत. आरोग्य विभागांतर्गत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांचे प्रलंबित मानधन देखील लवकरात लवकर प्रयत्न करण्यात येतील. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. यादृष्टीने राज्य शासनाच्यावतीने लसीकरण होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साखर कारखाने आहेत. साखर कारखान्यांनी प्राणवायू निर्मिती प्रकल्प आणि कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगून ते म्हणाले, परराज्यातून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या नागरिकांची तपासणी करा. रुग्णालयांचे फायर, इलेक्ट्रिकल व ऑक्सिजन ऑडिट करुन घेऊन त्यातील त्रूटी दूर करा. जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांच्या बिलाचे ऑडिट करुन अधिक दर आकारणाऱ्या रुग्णालयांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. शहरासह काही ग्रामीण भागात चौका चौकात विनाकारण नागरिक फिरत असल्याचे आढळून येत आहे. लक्षणे नसलेल्या बाधित रुग्णांमुळे देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. नागरिकांनी नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करुन विनाकारण, विना मास्क घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करा, अशा सक्त सूचना पोलीस विभागाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कोरोना नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असणाऱ्या उपाययोजनाबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली, तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन तयार असल्याचे सांगितले. यावेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी कोविडच्या अनुषंगाने मतदार संघात आरोग्य विषयक सोयी सुविधांची मागणी उपमुख्यमंत्र्यांकडे केली तर पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी शासनाकडून आवश्यक असणाऱ्या बाबींचा उहापोह करुन आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here