पुणे महानगर पालिकेने 24 जून रोजी पुण्यातील आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली कारवाई केली होती. स्थानिक नागरिक आणि पोलिस-प्रशासन आमनेसामने आले होते. घरे पाडण्याचे काम सुरू असतानाच नागरिकांनी याला कडवा विरोध करत कोरोनाचे संक्रमण असताना आम्हाला घराबाहेर काढू नका असेही नागरिकांनी सांगितले होते. 5 ते 6 जणांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवळपास 700 ते 800 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.त्यानंतर न्यायालयाने या कारवाईला तुर्तास स्थगिती दिली.
पुण्यातील आंबिल ओढा परिसरातील नागरिकांनी आपली घरे बांधून देण्याच्या मागणीसाठी पुणे महानगर पालिकेसमोर आजपासून ठिय्या देत आंदोलन सुरु केले आहे. यामध्ये वंचित बहूजन आघाडीचे कार्यकर्ते आणि स्थानिक लोक आणि महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलनस्थळी भेट पीडितांशी संवाद सांधला.त्यांनी महानगर पालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाई संदर्भांत संपूर्ण माहिती जाणून घेतली.आंबिल ओढा प्रकरण हे संवेदनशील विषय असून येथे कोणीही राजकरण करु नये असा सल्ला सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिला. मी इथं राजकरण करण्यासाठी आले नसून हा तुम्ही आम्ही मिळून हा प्रश्न कसा मार्गी लावता येईल यासाठी आले आहे.