गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांनी आरटीपीसीआर करणे सक्तीचे नाही. गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा. कोरोनाचे नियम पाळा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. फक्त काळजी म्हणून चाकरमान्यांनी अॅण्टीजन टेस्ट केली तर चालेल.आरटीपीसीआर केली नाही म्हणून चाकरमान्यांना गावात कोणी अडवणार नाही असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
माझे जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे. चाकरमान्यांना कोणतीही आरटीपीसीआरसाठी सक्ती केली जाणार नाही. खबरदारी म्हणून चाकरमान्यांनी अॅण्टीजेन चाचणी करावी. गावात त्यांना कोणीही अडवणार नाही असेही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासनाने सुरुवातीला दोन डोस घेतलेल्यांना आणि 72 तासांपुर्वी आरटीपीसीआर चाचणी करणाऱ्यांना जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार होता. बाकीच्यांना आरटीपीसीआर चाचणी करावी लागणार होती. एवढे सांगूनही लोक कणकवली रेल्वे स्थानकात उतरल्यावर संरक्षक कठडय़ावरून उडय़ा मारून सामान घेऊन आपल्या गावी जात आहेत. प्रशासनाला फसवून असे जाण्याने कोरोनाचा संसर्ग गावागावात पसरला जाईल आणि एकदा रुग्णवाढ झाली कि ती कमी करण्यासाठी टाळेबंदी आणावी लागेल.पुन्हा अर्थचक्र थांबले जाईल.कोरोना घरात न येणे यासाठी जपणे आणि नियम पाळणे हे नागरिकांच्या हातात आहे.