गांधीनगर येथील प्रादेशिक कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राचे घवघवीत यश

0
73

केंद्र शासनामार्फत गांधीनगर (गुजरात) येथे आयोजित करण्यात आलेल्या पश्चिम प्रादेशिक कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राने घवघवीत यश मिळविले आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून गेलेल्या युवकांनी २२ सुवर्ण आणि २३ रजत पदके, अशा एकूण ४५ पदकांची कमाई करुन स्पर्धेत अग्रस्थान पटकावले आहे. या सर्व स्पर्धकांचे राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी अभिनंदन केले असून त्यांना पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्यातून आता एकूण ६० पेक्षा अधिक स्पर्धक बंगळुरु येथे होणाऱ्या राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत सहभागी होणार असून तेथील विजेते स्पर्धक पुढील वर्षी शांघाय (चीन) येथे होणाऱ्या जागतिक स्किल्स चँपीयनशीपमध्ये सहभागी होतील. गांधीनगर स्पर्धेत पश्चिम प्रादेशिक ५ राज्ये आणि ओडीशा राज्याचा सहभाग होता. एकूण ८२ पैकी ४५ पदके पटकावून ५५ टक्के पदकांवर महाराष्ट्रातील युवक-युवतींनी आपले नाव कोरले आहे.  स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने २२ सुवर्ण आणि २३ रजत (एकूण ४५), राजस्थानने ८ सुवर्ण आणि ८ रजत (एकुण १६), गुजरातने ८ सुवर्ण आणि ४ रजत (एकूण १२), मध्य प्रदेशने ३ सुवर्ण आणि १ रजत (एकूण ४) गोव्याने १ सुवर्ण आणि २ रजत (एकूण ३) तर ओडीशाने २ रजत पदकांची कमाई केली आहे.

कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंन्द्र सिंह कुशवाह म्हणाले की, गांधीनगर येथील स्पर्धेत महाराष्ट्रातील तरुणांनी मिळविलेले यश अद्भूत असेच आहे. यासाठी या तरुणांनी फार मेहनत घेतली आहे. आता राष्ट्रीय आणि जागतिक स्पर्धेसाठीही त्यांनी अशीच तयारी करावी. या युवक-युवतींना विविध नामवंत उद्योगांशी कशा पद्धतीने जोडता येईल यासाठी विभाग प्रयत्न करेल. स्पर्धेत यश मिळविण्याबरोबरच या युवकांना त्यांच्यातील नवसंकल्पना आणि कौशल्याचा उद्योजकतेसाठी वापर करता येईल. कौशल्य विकास सोसायटीमार्फत यासाठी चालना देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

सुवर्ण पदक विजेते

राज्यातील मोहम्मद सलमान अन्सारी, रिंकल करोत्रा, दिशा सोनवणे, कोमल शिवाजीराव कोडलीकर, अंकीता अंबाजी गांगुर्डे, ज्ञानेश्वर बाबुराव पांचाळ, स्टॅनली सोलोमन, योगेश दत्तात्रय राजदेव, देवेज्या, श्रीराम कुलकर्णी, लावण्या पुंड,  विश्वजित रेवनाथ भुर्के, आयुषी अरोरा, पुर्वी सिधपुरा, गणेश भावे दगडोबा, मित्रा राव, अर्जुन मोगरे,  ओंकार गौतम कोकाटे, जीवन संपत चौधरी, तोजांगण रवींद्र ढाणू, विकास चौधरी, सजिव कुमार सबवथ यांनी सुवर्ण पदक पटकावले.

रजत पदक विजेते

मिलींद निकम, योगेश अनिल खंडागळे, सलमान रफीक शेख, वेद इंगळे, हर्षल गजानन शिरभाते, सचिन भारत जाधव, वृंदा पाटील, सृष्टी मित्रा, यश दिनेश चव्हाण, आकांक्षा कैलास पवार, मिर्झा कबिरुल्लाह बेग मिर्झा असदुल्लाह बेग, प्रियांका सिद्धार्थ टिळक, योगेश दत्तू गनगोडे, प्रतिक राजेंद्र हिनघेद, आनंद फकिरा घोडके, ध्रुव पाटील, ओम विनायक गायकवाड, अश्लेषा भरत इंगवले, अभिषेक भाई पाटील, मोहम्मद हानिफ मोहम्मद यासीन बेलीम, आदित्य दीपक हुगे, भार्गव कुलकर्णी, जुनेद अडेनवाला यांनी रजत पदक पटकावले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here