कोरोनाच्या महामारीने सर्वच उद्योग -धंद्यांना फटका बसला आहे. त्यातच सर्वात जास्त हानी शाळेत जाणाऱ्या मुलांची झाली आहे आणि तीसुद्धा गरीब मुलांना याची झळ जास्त बसली आहे.हीच गोष्ट लक्षात घेऊन गोव्यातील पाच व्यावसायिक तरुण मुलांनी एकत्र येऊन अशा गरीब मुलांना शोधून त्यांना कोणतेही मानधन न घेता शिकविण्यास सुरुवात केली आहे.
गोव्यातील टाळेबंदी उठताच हे तरुण या मुलांच्या घरी, त्यांच्या गावात जाऊन शिकविण्यास सुरुवात करणार आहेत.यातीलच एका तरुणाने ज्या मुलांना स्पर्धात्मक परीक्षा द्यायच्या आहेत अशा मुलांनाही शिकविण्यास तयार आहे.तर एका गावातील ६वी,७वी आणि ८ वीतील ३ भावंडांना या तरुणांनी शिकविण्यास सुरुवात केली आहे.शिवाय अनाथालयातील मुले,ज्यांच्या कोरोनामुळे नोकरी-धंद्यावर परिणाम झाला आहे अशा कुटुंबातील मुलांना गरिबीमुळे शिक्षण घेणे दुरापास्त झाले आहे अश्या मुलांना शिकवण्याचे त्यांनी ठरविले आहे. त्याशिवाय ज्या तरुणांना शिकविण्याची आवड आहे त्यांनी सुद्धा या तरुणांच्या उपक्रमात सहभागी व्हावे असेही त्यांनी आवाहन केले आहे.