जपानमध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेने नागरिकांना बेजार केले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा संपूर्णपणे कोलमडून पडली आहे. त्यातच प्रशासनाचा पुढे ढकललेल्या ऑलम्पिक स्पर्धा सुरु करण्याचा मानस आहे. कोरोनामुळे आधीच बेजार झालेल्या नागरिकांचा ऑलम्पिक भरविण्यासाठी विरोध आहे.जपानने आशियायी देशातून येणाऱ्या प्रवाशांवर कडक निर्बंध घातले आहेत.
कोरोनाच्या चौथ्या लाटेत नागरिकांचा घरातच मृत्यू होत असल्याचे दुर्दैवी चित्र पाहावयास मिळत आहे. बाधितांच्या संख्येच्या तुलनेत बेडची संख्या अपुरी पडू लागली आहे. ओसाका प्रांतात दोन महिन्यात १७ जणांचा घरातच मृत्यू झाला आहे. त्यांच्यात कोरोनाचे विषाणू आढळून आले आहेत. देशातील बहुतांश रुग्णालये भरलेली असून कोरोनाबाधित आणि गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या नागरिकांना नाईलाजाने घरातच राहावे लागत आहे. जपानचे सरकार हतबल झाले असून नागरिकांचा संताप वाढत चालला आहे.