तिवरे धरणग्रस्तांसाठी सिद्धीविनायक न्यासाने दिलेल्या 5 कोटी रुपयांच्या निधीतून बांधलेल्या 24 घरांचे आज लोकार्पण होत आहे, त्यांना हक्काचा निवारा मिळत आहे याचे समाधान आहे, यातील उर्वरित धरणग्रस्तांनाही एक वर्षाच्या आत घरे देण्यासाठी लागणाऱ्या 7 कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव व आराखडा तातडीने पाठवावा, हा निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण दुर्घटनाग्रस्तांसाठी चिपळूण तालुक्यातील अलोरे येथे सिद्धीविनायक न्यासाच्या निधीतून घरे बांधण्यात आली आहेत. त्याचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, आज आपल्या मनात संमिश्र भावना आहेत. एकीकडे दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या दुर्देवी लोकांच्या कुटुंबियांविषयी मनात सहवेदना आहे तर दुसरीकडे बाधितांना त्यांच्या हक्काचा निवारा आपण आज देत आहोत. या आपत्तीच्या प्रसंगात अनेकांनी मदतीचे हात पुढे केले त्यात सिद्धीविनायक मंदिर न्यासाचाही सहभाग होता. त्यांनी बाधितांच्या पुनर्वसनासाठी जी मदत केली त्या मदतीमुळे भाविकांनी मंदिरात केलेले दान सत्पात्री लागले आहे असे म्हणता येईल. मी हे दान करणाऱ्या भाविकांना आणि मंदिर न्यासाला त्यांच्या या मदतीसाठी धन्यवाद देतो असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. कोविड काळात राज्यातील अनेक देवस्थानांनी पुढाकार घेऊन राज्य शासनाला आणि थेट नागरिकांना केलेल्या मदतीचाही यावेळी आवर्जुन उल्लेख केला.
श्री. ठाकरे यांनी तिवरे धरणग्रस्तांना नवीन घरे देताना आजूबाजूच्या परिसरात पुन्हा अशा घटना घडणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना देऊन मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, निसर्गाची ताकत मोठी आहे. निसर्ग लहरी होत आहे. अनियंत्रित, अनियमित पावसामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता असते हे लक्षात घेऊन राज्यभरात अशा प्रकारे घटना घडू नयेत यासाठी सावधगिरी बाळगण्याच्या सूचना आपण दिल्या आहेत. वित्तहानी भरून काढता येते परंतु मनुष्यहानी ही न भरून येणारी असते. त्यामुळे एकही जीव जाऊ न देणे हे आपले पहिले प्राधान्य असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी यावेळी तिवरे धरणग्रस्तांचे पुनर्वसन करताना उर्वरित घरांच्या बांधकामासाठी 7 कोटी रुपये लागणार असून हा निधी लवकरात लवकर मिळाल्यास उर्वरित बाधित कुटुंबांनाही हक्काचा निवारा लवकर मिळू शकेल अशी मागणी केली.
सिद्धीविनायक मंदिराने या आपत्तीच्या प्रसंगात तिवरे धरणग्रस्तांच्या पाठीशी उभे राहताना त्यांच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न केल्याचे अध्यक्ष आदेश बांदेकर म्हणाले. त्यांनी सिद्धीविनायक मंदिर न्यास विविध सामाजिक उपक्रमांसाठी, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रासाठी मदत करत असल्याचेही सांगितले. हा पैसा भाविकांनी मंदिरात दान केलेला पैसा आहे तो राज्यातील नागरिकांच्या मदतीसाठी वापरण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न असल्याचेही श्री. बांदेकर यांनी सांगितले.
कार्यक्रमात खासदार विनायक राऊत यांच्यासह इतर उपस्थित काही मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. त्यात त्यांनी तिवरे दुर्घटना, नागरिकांना पुन्हा उभे करण्यासाठी करण्यात आलेले सामूहिक व प्रशासकीय पातळीवरचे प्रयत्न आणि इतर बाबींचा आढावा घेतला. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना राज्य आणि केंद्राचे मिळून प्रत्येकी 6 लाख रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आल्याची, पशुधनाच्या हानीपोटी 3 लाख रुपयांच्या रकमेचे वाटप करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.