राज्यात आढळून येणाऱ्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे परिस्थिती बिकट होत आहे. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण पडत आहे.कोरोनाच्या औषधांसह बेड्स, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन तुटवड्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांमुळे राज्य सरकारकडून लॉकडाउनचा विचार सुरू आहे.काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्व पक्षीय नेत्यांची बैठक घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. त्यांचे मुद्दे लक्षात घेतले. लॉकडाउनची गरज असल्याचे त्यांनी संकेत दिलेले आहेत.
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी राज्यातील आणि देशातील करोना परिस्थितीवरून बोलताना म्हणाले “देशात लॉकडाउनची गरज आहे की, नाही याचा निर्णय पंतप्रधान घेतील. पश्चिम बंगालच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर याविषयी केंद्र सरकार निर्णय घेऊ शकते. जास्तीत जास्त लसींचे डोस राज्यांना दिले गेले पाहिजेत. लोकांच्या जीवांचं रक्षण करणाऱ्या लसींचा आणि औषधांचा गैरवापर होऊ नये. गुजरातबद्दल जास्त प्रेम वाटत असेल, तर ठिक आहे, पण संपूर्ण देश तुमचा आहे,” केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावरही संजय राऊत यांनी निशाणा साधला.
“प्रकाश जावडेकर दिल्लीत बसून जे ज्ञानामृत देत आहेत, त्याची गरज महाराष्ट्राला नाही. त्यांनी महाराष्ट्रात यावं. त्यांनी मुंबईत बसावं, पुण्यात बसावं, इथली परिस्थिती बघावी. देवेंद्र फडणवीसांनी लॉकडाउनला विरोध केला असेल. ती त्यांच्या पक्षाची राज्यापुरती भूमिका आहे. देशातील भूमिका वेगळी असू शकते. जर मोदींनी देशात पुन्हा लॉकडाउन लागू केला, तर देवेंद्र फडणवीस म्हणतील का की महाराष्ट्र सोडून देशभरात लॉकडाउन लागू करा. अशा परिस्थितीत राजकारण करणं कुणालाही शोभत नाही. लोकांचे जीव वाचवावे लागतील,” अशी भूमिका राऊत यांनी मांडली.