वेंगुर्ले । प्रतिनिधी अजय गडेकर
जगातले पर्यटक सिधुदुर्गात यावेत आणि पर्यटनाच्या माध्यमातून लोकांना आर्थिक समृद्धी प्राप्त व्हावी यासाठी सिधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा होण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केले. बाजारपेठ ही नागरी सुविधा आहे. बाजारपेठ कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे वेंगुर्ल्याचे मच्छिमार्केट आहे. नागरी सुविधा होत असताना दरडोई उत्पन्न कसे वाढेल याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने लक्ष द्यावे. विकास करताना अंतर्गत वाद, मतभेद बाजूला ठेऊन एकत्र आल्यास विकास लांब नाही. जनतेच्या ऋणाची परतफेड विकासातूनच करणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी वेंगुर्ला मच्छिमार्केटच्या लोकार्पण प्रसंगी केले.वेंगुर्ल्यातील जुन्या मच्छिमार्केटच्या ठिकाणी नागरिकांची अनेक वर्षापासून असलेली व गरजांचा विचार करुन बांधण्यात आलेल्या ‘सागररत्न मत्स्य बाजारपेठे‘चे लोकार्पण सोहळा केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे व माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज ऑनलाईन पद्धतीने झाले.
वेंगुर्ले येथील या नूतन मच्छिमार्केटच्या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात व्यासपिठावर खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार रविद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, सिधुदुर्ग जिल्हा नगरपरिषद प्रशासन अधिकारी वैभव साबळे, काँग्रेसचे कार्याध्यक्ष विलास गावडे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, जि.प. सदस्य दादा कुबल, तहसिलदार प्रविण लोकरे, मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, नगरसेवक साक्षी पेडणेकर, प्रशांत आपटे, सुहास गवंडळकर, प्रकाश डिचोलकर, शितल आंगचेकर, शैलेश गावडे, कृतिका कुबल, विधाता सावंत, कृपा मोंडकर, नागेश गावडे, स्नेहल खोबरेकर, धर्मराज कांबळी, श्रेया मयेकर, पूनम जाधव, आत्माराम सोकटे आदी उपस्थित होते.यावेळी पुढे बोलताना मंत्री राणे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी भरघोस निधी दिला आहे. फडणवीस यांचे सर्वांनी आभार मानले. परंतु, त्यांच्याकडून बोध घेणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाकलेला विश्वास सार्थकी लावेन,असेही सांगितले.प्रगत देशातील बाजारपेठांसारखे वेंगुर्ले मच्छिमार्केटचे काम झाले आहे. हे मच्छिमार्केट वेंगुर्ल्याच्या सौंदर्यात भर टाकणारे असून ही बाजारपेठ मैलाचा दगड ठरणारी आहे,असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगताना ८० टक्के उद्योग राणेंकडे येतात.त्यामुळे कोकणच्या विकासाला गती देण्याचे काम नारायण राणे यांच्या हातून होणार आहे. विकासकामांसाठी माझी नेहमी मदत राहिल असेही ते म्हणाले.
वेंगुर्ले शहराची ओळख मच्छिमार्केट आहे.वेंगुर्ल्यातील हा मच्छिमार्केटचा प्रकल्प पाहून अभिमान वाटतो. मच्छिमार्केट नसून ते मॉल असल्याचा भास होतो. निधीचा उपयोग कसा करायचा हे त्यांनी योग्यरितीने दाखवून दिले असल्याबाबत आमदार नितेश राणे यांनी गौरवोद्गार काढले.तर दोन्ही पक्षांचे मंत्री एकाच व्यासपिठावर पाहून नक्कीच युतीची चर्चा होणार असल्याचेही ते म्हणाले.
वेंगुर्ल्याची ही श्रीमंती कायम राखण्यासाठी लोकप्रतिनिधींनी ठामपणे उभे रहावे.वेंगुर्ल्याला काही कमी पडू देणार नाही असे सांगताना मच्छिमार्केट बांधताना ऐतिहासिक परंपरा जपल्याबद्दल खासदार राऊत यांनी आर्किटेक्चरचे कौतुक केले.भूमिगत विजवाहिन्या प्रकल्प राबविणारी वेंगुर्ले ही पहिली नरगपरिषद असल्याचेही त्यांनी सांगितले.
संघर्षानंतर ही वास्तू उभी राहिली आहे.मच्छीच्या घाण पाण्यावरही प्रक्रिया करण्याचे नियोजन केले आहे.५ वर्षात जे जे योजिले होते ते ते लोकप्रतिनिधींच्या मानसिकतेमुळे पूर्ण झाले असल्याचे रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.काम करताना दृष्टी चांगली लागते आणि ती दृष्टी येथे मिळाल्याने ही वास्तू उभी राहिली. मिळालेल्या निधीचा उपयोग योग्य झाला आहे. यापुढे या वास्तूत चांगला व्यापार व्हावा, असे आमदार केसरकर यांनी सांगितले.या कार्यक्रमावेळी खा.विनायक राऊत दीपक केसरकर,रविंद्र चव्हाण, नितेश राणे, राजन तेली, विलास गावडे, वैभव साबळे, आर्किटेक्चर अमित कामत, अॅड.श्याम गोडकर, कॉन्ट्रक्टर एस.एल.ठाकूर, आर्टीस्ट सुनिल नांदोस्कर, इलेक्ट्रीशियन विनित पांगम, नगरअभियंता अभिषेक नेमाणे, खगोलशास्त्राची माहिती असणारा तुळसचा सुपुत्र कु. विजय तुळसकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत नगराध्यक्ष दिलीप गिरप, सूत्रसंचालन नगरसेवक प्रशांत आपटे तर आभार मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे यांनी मानले.