बालकांना बीसीजी, पोलिओ, रोटाव्हायरस, पेंटाव्हेलेंट, गोवर रुबेला, जेई, डीपीटी इत्यादी लसी नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत दिल्या जातात. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार बालकांचे न्युमोनियापासून संरक्षण करण्याकरिता पीसीव्ही लस दिली जाणार आहे. राज्याच्या नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत या लसीचा समावेश करण्यात आला असून त्यासाठी आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
बालकांना पीसीव्ही लसीच्या तीन मात्रा दिल्या जाणार असून जन्मानंतर सहाव्या आठवड्यात 14 व्या आठवड्यात आणि नवव्या महिन्यात लस दिली जाणार आहे. नियमित लसीकरण कार्यक्रमात ही लस देण्यास सुरुवात झाल्यानंतर अर्भकांच्या मृत्युच्या प्रमाणात घट होण्यास मदत होईल, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी सांगितले. या लसीसंदर्भात प्रशिक्षण आणि मार्गदर्शक सूचना जिल्ह्यांना देण्यात आले असून जाणीव जागृतीसाठी पोस्टर्स, बॅनर्स तयार करण्यात आल्याचे डॉ.व्यास यांनी सांगितले.