पालघर जिल्ह्यासह पेसा अंतर्गत शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेणार – शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

0
108

पालघर जिल्ह्यासह राज्यातील पेसा अंतर्गत शिक्षकांच्या सर्व रिक्त जागा भरण्यास शासन सकारात्मक आहे. या जागा भरण्यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला जाईल, असे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितले. या जागा भरण्यासाठी आयुक्तांनी तातडीने प्रस्ताव सादर करावा आणि शिक्षण विभागाने सामान्य प्रशासन आणि वित्त विभागाची परवानगी घ्यावी, असे निर्देशही प्रा.गायकवाड यांनी दिले.

पालघर जिल्ह्यातील शिक्षकांची पदे भरताना पवित्र पोर्टल प्रणाली लागू न करता स्थानिक पातळीवरप्रक्रिया राबवावी या मागणीसाठी तेथील आदिवासी डीटीएड, बीएड (टीईटी/ सीटीईटी) कृती समितीने आंदोलन केले आहे. त्याची दखल घेऊन प्रा.गायकवाड यांनी याबाबत ऑनलाईन बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी पालघर जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधी, शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार मीना, शिक्षण आयुक्त विशाल सोळंखी, पालघर जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्यासह आंदोलनकर्ते आदिवासी डीटीएड, बीएड (टीईटी/ सीटीईटी) कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या सर्व रिक्त जागा भरण्याबाबत सामान्य प्रशासन आणि वित्त विभागाची परवानगी घेतली जाईल. तसेच ही भरती प्रक्रिया राबविताना त्याच क्षेत्रातील उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल, असे श्रीमती वंदना कृष्णा यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here