प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावरच्या पथ संचलनात ‘महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्तम चित्ररथाचे पारितोषिक जाहिर

0
75
महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्तम चित्ररथाचे पारितोषिक जाहिर

मुंबई, दि. ३० : प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर झालेल्या पथ संचलनात ‘महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती’ संकल्पनेवर आधारित चित्ररथ सहभागी झाला होता. संरक्षण मंत्रालयाच्यावतीने महाराष्ट्राच्या या चित्ररथाला सर्वोत्तम चित्ररथाचे दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक जाहिर झाले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा पुरस्कार महाराष्ट्रातील समस्त महिला शक्तीला समर्पित केला आहे.

यावर्षी सहभागी झालेल्या चित्ररथामध्ये उत्तराखंडच्या चित्ररथाला पहिल्या क्रमांकाचे आणि उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. उद्या मंगळवार दि. ३१ जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक संचालक हे पारितोषिक स्वीकारतील.

दरवर्षी दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या पथसंचलनात विविध राज्यांच्या संस्कृतीचे प्रदर्शन करणारे चित्ररथ संचलित होत असतात. यावर्षी महाराष्ट्राने नारीशक्ती या आशयाखाली “महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे व नारीशक्ती” हा विषय निवडला होता. त्याबरोबरच महाराष्ट्राच्या लोककला आणि मंदिर शैलींचा वारसा दाखवण्याचाही यातून प्रयत्न करण्यात आला होता. अत्यंत दिमाखदार व आकर्षक पद्धतीने हा चित्ररथ कर्तव्यपथावर संचलित झाला होता. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची आई भवानी, माहूरची रेणुका माता आणि वणीची सप्तशृंगी माता यांच्या विलोभनीय प्रतिकृती चित्ररथावर सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. संबळ वाजवणारा गोंधळी हा देवीशी निगडित असणारा लोककलाकार भव्य स्वरूपात दर्शवण्यात आला होता. चित्ररथा सोबत निषाद गडकरी व सुमित यांच्या समूह पथकाने शानदार नृत्य सादरीकरण केले होते. या चित्ररथासाठी प्रसिद्ध कवयित्री, लेखिका व निवेदिका प्राची गडकरी यांनी चार कडव्यांचे गीत लिहिलेले होते. कौशल इनामदार यांनी यापैकी तीन कडवी घेऊन सुंदर गीत तयार केले होते. सिद्धेश व नंदेश उमप यांनी हे गीत लोककलेच्या ढंगाने गायल्यामुळे कर्तव्यपथावर हे गीत एकदम उठावदार झाले.

या चित्ररथाची मूळ संकल्पना सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची होती तर या संकल्पनेचे विस्तारीकरण प्रधान सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक विभीषण चवरे यांनी केले होते. शुभ आर्ट या नागपूर येथील संस्थेने चित्ररथावरील शिल्पाचे काम साकार केले होते

१९७० पासून दिल्लीतील राजपथावर महाराष्ट्र चित्ररथ सादर करीत आहे. मात्र दरवर्षी काही राज्यांनाच चित्ररथ सादर करण्याची संधी मिळत असल्याने आतापर्यंत ११ वेळा महाराष्ट्राला चित्ररथ सादर करण्याची संधी मिळालेली नाही. तशी ती यावर्षीही नाकारण्यात आली होती. मात्र नागपूर अधिवेशनादरम्यान सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी थेट संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना फोन करून महाराष्ट्राला यावर्षी चित्ररथ सादर करण्याची संधी द्यावी अशी विनंती केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्राला संधी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे श्री. मुनगंटीवार यांनी श्री. सिंह यांचे विशेष आभार मानले आहेत.आतापर्यंत एकूण ७ वेळा महाराष्ट्राच्या चित्ररथाला पहिले पारितोषिक तर ४ वेळा दुसरे पारितोषिक आणि २ वेळा तृतीय पारितोषिक मिळाले आहे. तर एकदा लोकप्रिय चित्ररथ यामध्ये पहिले पारितोषिक मिळाले आहे. सलग तीन वर्षी सर्वोत्तम चित्ररथाचे पहिले पारितोषिक पटकविण्याचा विक्रमही (हॅटट्रिक) राज्याच्या नावावर जमा आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here