प्रत्येकाने आपल्या निवासी तसेच कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करावे – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

0
78

राज्यातील प्रत्येक नागरिकाने आपण राहत असलेल्या परिसरात तसेच कार्यालयांनी त्यांच्या परिसरात शक्य असेल त्या प्रमाणात वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करावे, असे आवाहन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.माझी वसुंधरा अभियानांतर्गत सर्व प्रकारची कार्यालये, गृहनिर्माण संस्थांच्या परिसरात निसर्ग उपवन (मिनी फॉरेस्ट) निर्माण करावे या पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून वांद्रे येथील म्हाडा कार्यालय परिसरात मिनी फॉरेस्ट निर्माण केले जात आहे. राज्यात आजपासून सुरू होत असलेल्या वन महोत्सवाच्या निमित्ताने या मिनी फॉरेस्टचा शुभारंभ श्री.ठाकरे यांच्या हस्ते आज वृक्षारोपण करून करण्यात आला. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर आदी उपस्थित होते.

‘मिशन ग्रीन मुंबई’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून या मिनी फॉरेस्टची निर्मिती करण्यात येत असून येथे वाहनांच्या पार्किंगच्या सुमारे दोन हजार चौ. फूट जागेत ४० प्रकारची ३०० झाडे लावण्यात येत आहेत. श्री.ठाकरे यांनी या उपक्रमाचे कौतुक करून यात योगदान देणाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार केला.यावेळी माध्यमांशी बोलताना श्री.ठाकरे म्हणाले, नुकतेच कॅनडामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढलेले तापमान हे वातावरणात होणाऱ्या बदलाचे संकेत आहेत. महाराष्ट्रातही वातावरणीय बदलांचे परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागत आहे. हे का घडत आहे त्याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली असून त्यासाठी प्रत्येकाने आपापल्यापरीने वृक्ष लागवड करून त्यांची जोपासना करावी, असे आवाहन त्यांनी केले.

सध्या महाराष्ट्र विविध संकटांचा सामना करीत आहे. या परिस्थितीत शासनाला मदत म्हणून म्हाडाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपल्या पगारातून जमा केलेल्या ३१ लाखांचा धनादेश श्री.घोसाळकर यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मंत्री श्री.ठाकरे यांच्याकडे यावेळी सुपूर्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here