आधुनिक भारताचे शिल्पकार भारतरत्न डॉ. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जातो. यावर्षी जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन, चर्नी रोड, मुंबई तर्फे इयत्ता आठवी ते दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा बालभवन, चर्नी रोड, मुंबई येथे आयोजित करण्यात आली. स्पर्धेतील मुलांचा उत्साह वाढविण्यासाठी बालभवन नियामक मंडळाच्या अध्यक्ष तथा शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड उपस्थित होत्या. प्रा.गायकवाड यांनी या मुलांच्या कलाकृतींची पाहणी केली व सर्व मुलांचे कौतुक केले.
या स्पर्धेकरिता ३५ शाळांमधील १०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेचे आयोजन कोरोना नियमांचे पालन करुन करण्यात आले होते. यामध्ये सर्व मुलांना मास्क, सॅनिटायझरची सुविधा पुरविण्यात आली.
या स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व मुलांना बालभवन तर्फे कलर बॉक्स देण्यात आले. त्याचबरोबर सर्व मुलांना स्पर्धेत सहभागाबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले. स्पर्धेतील चित्रांचे परीक्षण करण्यासाठी विशेष परीक्षक नेमण्यात येणार असून त्यांच्यामार्फत घोषित केलेल्या उत्कृष्ट चित्रांना जवाहर बालभवनच्या फेब्रुवारी २०२२ च्या वर्धापन दिनी पारितोषिक देण्यात येणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक संतोष गायकवाड तर सूत्रसंचालन श्रीमती सृजनी यमनुरवार यांनी केले. आभार आसेफ शेख यांनी मानले.