बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 च्या कलम 37 (1) (2), कलम 2 (6) आणि कलम 10 (2) नुसार बृहन्मुंबई हद्दीत 24 जुलै 2021 पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी करण्यात आला आहे.
या आदेशानुसार नागरिकांना शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, परवानेरहित बंदुका, सुऱ्या, काठ्या- लाठ्या किंवा शरीरास इजा करण्याकरिता वापरता येईल अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगणे, दगड किंवा अस्त्र, सोडावयाची अस्त्रे, फेकावयाची हत्यारे, अग्नीशस्त्रे बरोबर घेणे, जमा किंवा तयार करणे, कोणतेही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, व्यक्तीची अगर प्रेते किंवा त्याच्या प्रतिमांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक रितीने घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे, सभ्यता अगर नितीविरुद्ध असतील अशी किंवा राज्याची शांतता धोक्यात येईल अशी भाषणे, हावभाव करणे, सोंग आणणे अशी चित्रे – चिन्हे, फलक अगर इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे किंवा त्यांचा लोकांत प्रसार करणे अशा बाबी करण्यास मनाई करण्यात आली आहे. या मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.
शासकीय, निमशासकीय किंवा सार्वजनिक उपक्रमामध्ये सेवा बजावत असताना कर्तव्याच्या स्वरुपामुळे वरील शस्त्रे बाळगणे आवश्यक असणाऱ्या व्यक्तींना हा आदेश लागू असणार नाही. खाजगी सुरक्षा रक्षक, गुरखा, चौकीदार आदींना साडेतीन फूट लांबीपर्यंतची लाठी बाळगण्यास मनाई असणार नाही, असेही बृहन्मुंबई पोलीस उपआयुक्त (अभियान) यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.