भुईबावडा घाटमार्गे प्रवास धोक्याचा

0
83

घाट रस्त्याच्या मध्यभागी पडल्या आहेत मोठ्या भेगा; रस्ता खचण्याची दाट संभवना

मंदार चोरगे/ वैभववाडी

भुईबावडा घाटमार्ग दिवसेंदिवस ढासळत चालला आहे. दरवर्षी घाट मार्गावर कोट्यवधी रूपयांचा निधीही खर्च केला जातो. मात्र पावसाळा आला की घाटमार्ग आजारी पडतो. गतवर्षी घाट रस्त्याच्या मध्यभागी भेगा पडल्या होत्या. याठिकाणी केवळ मलमपट्टी करण्यात आली. मात्र वर्ष झाले तरी अद्यापही संबंधित विभागाने यावर कोणतीच ठोस उपाययोजना न केल्याने दिवसेंदिवस रस्ता खचत चालला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला कोल्हापूरहून जोडण्यात महत्त्वपूर्ण भुईबावडा व करुळ या घाटांचा समावेश आहे. पावसाळ्यात हे दोन्ही घाट धोकादायक स्थितीत असतात. विशेषतः भुईबावडा घाट धोकादायक स्थितीत असतो. अतिवृष्टीत अनेकदा घाट रस्त्यावर दरडी, दगड कोसळून वाहतूक ठप्प झाल्याचे प्रकार घडले. त्यामुळे कोकणाला जोडणारे घाट वाहनचालकांसाठी धोकादायक वाटू लागले आहेत.
यावर्षी पावसाचे निर्धारित वेळेआधीच आगमन झाल्याने घाटमार्गात किरकोळ पडझडीच्या मालिका सुरू झाल्या आहेत. यापूर्वी न आलेला निधी दोन वर्षापूर्वी कोट्यवधी रुपयांचा निधी भुईबावडा घाटाला आला. घाटमार्गातील कामेही करण्यात आली. मात्र मोठ्या प्रमाणात निधी येवूनही घाटमार्गातील गळती थांबता थांबेना.
भुईबावडा-रिंगेवाडी पासून सुमारे चार ते पाच कि. मी. अंतरावर रस्त्याच्या मध्यभागी मोठ्या भेगा पडल्या आहेत. याठिकाणी मामुली मलमपट्टी करण्यात आली आहे. मात्र एक वर्ष होऊनही संबंधित विभागाने ठोस अशी कोणतीच उपाययोजना केलेली नाही. पावसाचा जोर कायम राहिल्यास याठिकाणी रस्ता खचण्याची दाट संभवना आहे. वेळीच याठिकाणी उपाययोजना केली नाही तर मोठी दुर्घटना घडू शकते. भुईबावडा घाट दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत ‘डेंजरझोन’ बनला आहे.
भुईबावडा घाटात पाच-सहा वर्षापूर्वी याच ठिकाणी अर्धा रस्ता खचला होता. यामार्गावरील वाहतूक तब्बल एक महिना ठप्प होती. याच ठिकाणी दरीकडील संरक्षण भिंत कोसळली आहे. याठिकाणी बॕरल लावण्यात आली आहेत. पावसाळ्यात ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरडी कोसळतात त्याठिकाणी संरक्षण जाळी बसविणे गरजेचे आहे. धोकादायक वळणे जेसीबी व पोकलॕन्डच्या साहाय्याने हटविणे गरजेचे आहे. मात्र संबंधित विभाग दरडी हटविण्यातच धन्यता मानत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here