मनपा शाळेत प्रवेशासाठी लॉटरी काढावी लागणे हेच या शाळांचे यश – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

0
78

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सीबीएसई आणि आयसीएसई अभ्यासक्रमाचे मोफत आणि दर्जेदार शिक्षण मिळू लागले आहे. मनपाच्या शाळांमध्ये प्रवेशासाठी आता लॉटरी काढावी लागली, यातच या शाळांचे यश असून प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केला जात आहे, असे प्रतिपादन पर्यावरणमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.

मुंबई पब्लिक स्कूल अंतर्गत मुंबईतील अजीज बाग परिसरातील नव्याने उभारलेल्या सीबीएसई शाळेचे उद्घाटन श्री. ठाकरे यांच्या हस्ते आज झाले. यावेळी अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, खासदार राहुल शेवाळे,  आदी उपस्थित होते.

श्री. ठाकरे म्हणाले, महापालिका क्षेत्रात सुमारे १२०० शाळा विविध आठ माध्यमांमधून शिक्षण देतात. आता यामध्ये सीबीएसई आणि आयसीएसई शाळांची भर पडत आहे. विशेष म्हणजे या शाळांमध्ये प्रवेशासाठी रांगा लागत असून यावर्षी प्रवेशासाठी लॉटरी काढावी लागली, यातच या शाळांचे यश आहे. यापुढे मनपाच्या प्रत्येक वॉर्डमध्ये सीबीएसई आणि आयसीएसई अभ्यासक्रमाची एक तरी शाळा सुरू व्हावी यासाठी प्रयत्न केला जात असून त्यापुढे जाऊन आयबी अभ्यासक्रम सुरू करण्याचाही प्रयत्न असणार आहे. शिक्षण पद्धती सोपी करण्याचा प्रयत्न शासनामार्फत केला जात असून शिक्षणासोबतच खेळांसारख्या इतर उपक्रमांवरही भर दिला जात आहे. यापुढे राज्यातील प्रत्येक मनपा आणि जिल्हा परिषदांमध्ये अशा दर्जेदार शाळा तयार होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

श्री मलिक म्हणाले, महानगरपालिकेमार्फत सीबीएसई आणि आयसीएसई अभ्यासक्रम सुरू झाल्याने सर्वसामान्य विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यासाठी मोठा लाभ मिळणार आहे. यासोबतच मोडकळीस आलेल्या किंवा बंद शाळा नव्याने उभारल्यास विद्यार्थी संख्या आणखी वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here