मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांत ९ ते १२ जून या चार दिवसांत अतिवृष्टीचा इशारा

0
100

मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांत ९ ते १२ जून या चार दिवसांत अतिवृष्टीचा हवामान खात्याने इशारा दिला आहे. सर्व यंत्रणांनी सतर्क आणि सज्ज रहावे. रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेताना धोकादायक भागातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा. धोकादायक इमारती, दरडग्रस्त भाग आणि लोलाईन एरियातील नागरिकांना गरजेनुसार सुरक्षितस्थळी हलवावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी दिल्या.

या अतिवृष्टी काळात गरज पडल्यास मदतीसाठी तटरक्षकदल, नौदलाला तयार राहण्याची सुचना कळवण्यात यावी. किनारपट्टी भागात होणाऱ्या या अतिवृष्टीची माहिती स्थानिक प्रशासनाने नागरिकांनाही द्यावी, या काळात नद्यांचा प्रवाह बदलतो आणि त्यामुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरते हे लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांची काळजी घ्यावी. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठका घेऊन जिल्ह्यातीलआपत्ती व्यवस्थापनाच्या कामांचा तातडीने आढावा घ्यावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.

अतिवृष्टी झाल्यास वीज पुरवठा खंडित होऊ शकतो हे लक्षात घेऊन रुग्णालयांनी पर्यायी व्यवस्था तयार ठेवावी, जनरेटर्स, डिझेलचा साठा, ऑक्सीजन चा साठा करून ठेवावा. कोविड केअर सेंटर्समधील रुग्णांना अडचण होणार नाही, येथे पाणी साचणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे अशाही सूचना त्यांनी दिल्या.मुंबई महानगर प्रदेशात जास्त पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे हे लक्षात घेऊन झाडे पडणे, पाणी साचणे, मॅनहोल उघडे राहणार नाहीत याची काळजी घेणे महत्वाचे आहे. धोकादायक इमारतीमधील नागरिकांना संक्रमण शिबिरात हलवणे गरजेचे आहे. मुंबई शहरात अनेक ठिकाणी विकास कामे सुरु आहेत, या कामाचे डेब्रीज रस्त्यावर आहे याची काळजी संबंधित यंत्रणेने घ्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here