रत्नागिरी : डुबी नदीवरील पिंपळवाडी धरणाचा धोका टळला

0
90

कोकणात झालेल्या अतिवृष्टीच्या आणि भुस्कलनाच्या घटनांमध्ये रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील डुबी नदीवरील पिंपळवाडीच्या धरणाला भगदाड पडले होते. अतिवृष्टीदरम्यान खबरदारीचा उपाय म्हणुन सात गावातील ग्रामस्थांना तत्काळ स्थलांतरीत करण्यात आले होते. 2019 साली चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती अनुभवलेली असल्याने धरणाच्या पायथ्याखाली वसलेल्या गावातील ग्रामस्थांनी स्थलांतरीत होणे पसंत केले होते.

गेल्या आठवड्यात पावसाने घातलेल्या थैमानानंतर डुबी नदीवर बांधण्यात आलेल्या पिंपळवाडी धरणाच्या पाण्याची पातळी कमालीची वाढली होती. हे वाढलेले पाणी थेट सांडव्यावरून वाहू लागले होते. पाण्याच्या जोरदार प्रवाहाने धरणाच्या मार्गदर्शक भितींची माती वाहून गेली होती.त्यामुळे धरणाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाला होता. धरणाला धोका निर्माण होऊन अनर्थ ओढवू नये याबाबत खबरदारी घेत महसुल विभागाने धरणाच्या पायथ्याशी वसलेल्या सात गावातील ग्रामस्थांना तत्काळ स्थलांतरीत होण्याच्या सुचना दिल्या होत्या.

या भगदाडाच्या डागडुजीचे काम पाटबंधारे विभागाने युद्धपातळीवर सुरु केले. धरणाला निर्माण झालेला धोका आता पुर्णपणे टळला असल्याने त्यांनी आता पुन्हा आपापल्या गावात परतावे असे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.

पावसाचा जोर कमी झाल्यावर पाटबंधारे विभागाच्या अलोर येथील यांत्रिकी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सपूर्ण धरणाची पाहणी केली. यावेळी धरणाला कुठेही गळती लागलेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. धरण सुरक्षित असल्याची खात्री होताच पाटबंधारे विभागाने पावसामुळे धरणाच्या मार्गदर्शिका भिंतीला पडलेले भगदाड बुजविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here