रत्नागिरी:देवरुख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, नुरल सिद्दिकी यांच्या घरावर अज्ञात दरोडेखोरांनी हल्ला केला. ही घटना आज पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास घडली.दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवत सुमारे 5 लाखांचे सोन्याचे दागिने, मोबाईल आदि वस्तू चोरुन नेल्या. या घटनेने संगमेश्वर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
घटनेच्या वृत्तांतानुसार चार अज्ञात इसमांनी नुरुल यांच्या घराचा मागील दरवाजाची कडी लोखंडी हत्याराने तोडून घरात प्रवेश केला. तोडण्याच्या आवाजाने नुरुल यांना जाग आली आणि ते आवाजाच्या दिशेने गेले असता चारही दरोडेखोरांनी नुरुल यांना बेदम मारहाण केली. नुरुल सिद्दिकी यांचा भाचा असादउल्ला याच्या तोंडाला दरोडेखोरांनी चिकटपट्टी लावली आणि सर्वांचे हातपाय दोरीने बांधून ठेवले. तोंडाला कपडा बांधलेला असल्यामुळे दरोडेखोरांचे चेहरे नुरुल यांना निट दिसून आले नाहीत. नुरुल यांच्यासह त्यांच्या पत्नीला पिस्तुलाचा धाक दाखवून बेडरुम मध्ये प्रवेश केला. स्क्रू ड्रायव्हरने लोखंडी कपाटे उघडून त्यातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल आदि सुमारे 5 लाख 38 हजार 100 रुपयांचा माल चोरुन नेला.दरोडेखोरांनी नुरुल यांच्याकडे दोन दिवसात पाच कोटींची खंडणी देण्याची मागणी केली.
नुरुल सिद्दिकी यांनी दरोड्याबाबत देवरुख पोलिसांना कल्पना दिली. पोलिसांनी घटनास्थस्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी दरोडेखोरांचे वर्णन, त्यांची भाषा, उंची आदि माहिती घेतली आहे. दरोडेखोरांचा माग श्वान पथकालाही काढता आला नाही.त्यामुळे दरोडेखोरांनी गाडीने पलायन केले असावे असा अंदाज पोलिसांचा आहे.