‘राजकारण आपलं होतं पण जीव जनतेचा जातो’, मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना खडेबोल

0
118

मंदिर उघडण्यात यावे या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विरोधकांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. अनेकांनी राज्यातील मंदिर उघडा या मागणीसाठी आंदोलनं केली. तुम्ही आंदोलन करा, आवश्य करा. पण कोरोनाविरुद्ध आंदोलन करा. आपण राजकारण करतो आणि त्यात जीव मात्र सामान्य जनतेचा जातो. हे चुकीचे आहे. असं व्हायला नको, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले आहे.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृती दलाने आज ‘माझा डॉक्टर’ ही ऑनलाइन वैद्यकीय परिषद आयोजित केली आहे. या परिषदेच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी आणि उपस्थित डॉक्टरांशी संवादही साधला. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला आणि जनतेला मार्गदर्शन सुद्धा केले.

अमेरिकेतील हॉवर्ड विद्यापीठातील डॉ. मेहुल मेहता यांनी संभाव्य तिसरी लाट आणि त्यामागची कारणे शोधली पाहिजे असे सांगून आज कोरोना संपला असे आपल्याला वाटायला लागले म्हणून अनेक लोक मास्क वापरत नाहीत, सण, उत्सव, विवाह, पार्टी सोहळे मोठ्या संख्येने करायला लागले त्यातून कोविड पसरण्याची शक्यता आहे. अजूनही लस घेतलेल्यांची संख्या कमी आहे. त्यातच विषाणूमध्ये बदल होत असून डेल्टाचा फैलाव वेगाने होतो आहे, डेल्टानंतर कोलंबियामध्ये नवा स्ट्रेन आढळून आल्याचे सांगून कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे आवाहन डॉ. मेहता यांनी केले.

दुखणं अंगावर काढण्याची सवय महागात पडू शकते, यात फॅमिली डॉक्टर्सची भूमिका अतिशय महत्त्वाची असून आपल्या रुग्णांची केवळ स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू, मलेरिया, लॅप्टो आदी आजारांची लक्षणे एकसारखीच असून एनएसवनएनएसटू बरोबरच मलेरिया, लॅप्टोच्या चाचण्यांसह कोविडसाठी आरटीपीसीआर चाचणी करणे आवश्यक असल्याचेही डॉ. ओक यांनी सांगितले. कोविड हे तीन आठवड्याचे दुखणे आहे, त्यातील दुसऱ्या आठवड्यातील शेवटचे दिवस हे महत्त्वाचे आहेत. त्यामुळे तीन आठवडे काळजीपूर्वक विलगीकरणात अथवा रुग्णालयात राहून काळजी घेण्याची गरज आहे. कोविड झाल्यानंतर उपचार, विलगीकरण आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देणे आवश्यक असून हा रोग लपविण्याची कोणतीही आवश्यकता नाही, शासन दरबारी याची नोंद होणे गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले.  दुसऱ्या लाटेत म्युकरमायकोसिसचा फटका बसला त्याच्या निदानासाठी सिटी स्कॅनपेक्षा एमआरआय करणे आवश्यक असल्याचे सांगतानाच सध्या तरी कोविडपासून संरक्षणासाठी मास्क हा उत्तम पर्याय असून मास्क घालणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे हे सांगण्याची वेळ आली आहे, असेही डॉ. ओक यांनी सांगितले.

फोर्टिस रुग्णालयाचे डॉ. राहुल पंडित म्हणाले की, कोविडने आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी शिकवल्या, शिस्त लावली. एखाद्या गुरुसारखे कोविडने आपल्याला शिकवले आहे. नव्या लक्षणांकडे लक्ष ठेवतानाच हाय रिस्क फॅक्टरमधील रुग्णांना जपण्याचे आवाहन त्यांनी केले. कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करतानाच रोज मास्क बदला आणि ओला झालेला मास्क कधीही लावू नका तो तात्काळ बदलण्याच्या सूचना देतानाच कोविडचे लक्षणे दिसली की वेळेत चाचण्या करण्याचे आवाहन त्यांनी केले. ऑक्सिजन प्रमाण ९३ पेक्षा कमी झाले असेल तर पोटावर झोपण्याचा सल्ला आम्ही देतो, त्याचे निश्चितच चांगले परिणाम बघायला मिळतात.

डॉ. अजित देसाई कोविड पश्चात लक्षणे ही मुख्यतः ४ ते १२ आठवडे असतात, ही केवळ गंभीर रुग्णांमध्येच नाहीत तर साधारण आणि लक्षणे नसलेल्या रुग्णांमध्ये सुद्धा ही लक्षणे दिसतात. सहा महिन्यापर्यंत ही लक्षणे असली तरी ती दीर्घ काळची लक्षणे मानले जातात, थकवा, सांधेदुखी, श्वसनास त्रास, ताणतणाव, निद्रानाश, भूतकाळात घडलेल्या वाईट गोष्टी पुन्हा पुन्हा आठवून तणावात जाणे, डोकेदुखी, छातीत वेदना आदी त्रास होतात. कोविड लक्षणांच्या काळात ईसीजीमध्ये अथवा टूडी इको मध्ये काही आढळल्यास त्यावर उपचार करणे खूप आवश्यक असते. ताण तणाव, चिंता असेल तेव्हा कुटुंबातील सदस्य, मित्रांबरोबर बोला त्यापेक्षाही अधिक गंभीर स्वरुपाचा तणाव असेल तर मानसोपचार तज्ज्ञांशी बोलण्याचा सल्ला देऊन कोविड पश्चात आपली जीवनशैली अधिकाधिक चांगली ठेवण्याचे प्रयत्न करण्याचे आवाहनही डॉ. देसाई यांनी केले.

बालकांसाठीच्या राज्य कृतीदलाचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभू यांनी कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत कोणती काळजी घेतली पाहिजे यावर सविस्तर मार्गदर्शन केले आणि काही पालकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. पहिल्या दोन लाटेमध्ये मुलांमध्ये कोविडचे कमी संक्रमण झाले. मुलांनी देखील संभाव्य धोका लक्षात घेता मास्क घालणे, हात स्वच्छ धुणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे या कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.

ज्या मुलांमध्ये संक्रमण झाले तर त्याची तीव्रता सर्वसाधारणपणे सौम्य असते, त्यांच्यावर घरीही उपचार करू शकतो, रुग्णालयात पुरेसे बेड उपलब्ध आहेत, गंभीर लक्षणे आढळल्यास मुलांना रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहेत, मुलाबरोबर पालकापैकी एकाला या मुलांसाठीच्या कोविडसेंटरमध्ये थांबण्याची व्यवस्था केलेली आहे असे सांगून या आजारामुळे मुलांना मानसिक त्रास होऊ नये याकरिता त्यांच्याशी फोनवरुन अथवा इतर माध्यमांद्वारे संवाद साधणे अधिक गरजेचे आहे. शाळा सुरू होण्याअगोदर पुरेशी दक्षता घेण्याची आवश्यकता असल्याचेही डॉ. प्रभू यांनी सांगितले. नवजात शिशु आणि आई यांची काळजी घेत असतानाच आईला जर कोविड असेल तर बाळाची आरटीपीसीआर चाचणी करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोविडची विविध लक्षणे आढळली, काही रुग्णांना चव आणि वास येत नाही, पोटरीचे स्नायू आणि पाटदुखी वाढली, डायरिया, उलटी होण्याचे लक्षणे दिसले. त्रास झाला किंवा कोणतीही लक्षणे दिसली तर ‘कोविड नाही ना?’ हा प्रश्न प्रत्येक डॉक्टर्सने आणि सुजाण नागरिकाने आपल्या मनाला विचारणे आवश्यक असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’, ‘मी जबाबदार’ नंतर ‘जाणता मी, जबाबदार मी’ ही भूमिका घेण्याची गरजही डॉ. ओक यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here