राजकीय कार्यक्रम, आंदोलने तसेच धार्मिक कारणांमुळे होणारी गर्दी थांबविण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरच व्यापक धोरणाची गरज – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
83

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करताना वाढणारी गर्दी हे एक मोठे आव्हान आहे. या दृष्टीने धार्मिक, सामाजिक कारणे तसेच राजकीय कार्यक्रम, आंदोलने यामुळे विविध ठिकाणी होणारी गर्दी थांबविण्यासाठी केंद्र सरकारनेच आता देशपातळीवर एक व्यापक धोरण आणावे अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्राने उचललेली ठोस पाऊले आणि तिसऱ्या संभाव्य लाटेसाठी नियोजन याची माहिती  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत दिली. केंद्र शासनाने देशातील सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक आयोजित केली होती, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

पंतप्रधान कोरोना परिस्थितीत राज्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतात यासाठी आभार मानून मुख्यमंत्री म्हणाले की, दुसऱ्या लाटेचे शेपूट देखील अद्याप वळवळते आहे, असे असतांना  रुग्ण संख्या घटत असली तरी पूर्णपणे कमी झालेली नाही. केवळ महाराष्ट्राचं नव्हे तर सर्वच ठिकाणी लोक घराबाहेर पडताहेत, गर्दी करताहेत रिव्हेंज टुरिझम, रिव्हेंज शॉपिंग सुरु झाले आहे. धार्मिक, राजकीय कारणांसाठी गर्दी होऊ लागली आहे. हे थांबविण्यासाठी राज्य प्रयत्न करते आहेच पण केंद्रीय पातळीवरून देखील आपल्याला काही व्यापक स्वरूपाचे धोरण आखावे लागेल असे दिसते.

मोनोक्लोनल एन्टीबॉडीज हे सध्या उपचारांमध्ये प्रभावी आहे मात्र त्याची  किंमत ५० ते ६० हजार प्रती डोस असून तिसऱ्या लाटेत  ५० हजार रुग्णांना जरी हे औषध द्यायचे म्हटले तर ३०० कोटी रुपये लागतील, याचा विचार करून  केंद्र सरकारने या औषधांवर किंमतीचे निर्बंध आणावेत तसेच त्याची सहज उपलब्धता होईल हे पाहावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

रुग्णालये आणि दवाखान्यातील डॉक्टर्स, नर्सेस यांनी केवळ मास्क घालून लोकांवर उपचार केले. सुरुवातीच्या काळात पीपीई किट्स होते पण नंतर मास्क घालून डॉक्टर्सनी उपचार केले आहेत. आज मास्क हाच आपला खऱ्या अर्थाने संरक्षक आहे, यासाठी सर्व पातळीवर लोकशिक्षण आणि काटेकोर अंमलबजावणी आवश्यक आहे, त्यासाठीही राज्य शासन प्रयत्न करीत आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here