राज्यात विभागनिहाय ‘उद्योग मॅप’ तयार करताना स्थानिकांसाठी रोजगार संधी

0
123

 राज्यातील प्रादेशिक वैशिष्ट्ये, साधनसामग्रीची उपलब्धता लक्षात घेऊन कोणत्या विभागात कोणते उद्योग सुरु करता येतील,  हे निश्चित करण्यासाठी राज्याचा विभागनिहाय ‘उद्योग मॅप’ तयार करण्याच्या सूचना विभागाला दिल्या असून या आरखड्याची निश्चिती झाली की आवश्यक त्या सोयी-सुविधा उद्योगांना उपलब्ध करून देण्यात येतील, या माध्यमातून स्थानिकांसाठीच्या रोजगार संधीचा मार्गही प्रशस्त केला जाईल असे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्यांनी राज्य शासन गुंतवणूकदारांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे आणि भविष्यातही राहील अशीही ग्वाही यावेळी दिली.

एक लाख कोटी डॉलरची क्षमता गाठण्याच्या दिशेने सुरु असलेल्या राज्याच्या औद्योगिक प्रगतीचा, त्या प्रगतीस पूरक ठरणाऱ्या पायाभूत सुविधांमध्ये होणाऱ्या सकारात्मक बदलांचा वेध घेण्यासाठी दै. लोकसत्ताने “इंडस्ट्रीयल कॉन्क्लेव्ह 2021 चे आयोजन केले होते, त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री कु.आदिती तटकरे, सीआयआयचे अध्यक्ष टी.व्ही नरेंद्रन, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, यांच्यासह उद्योग क्षेत्रातील मान्यवर तसेच अधिकारी उपस्थित होते.

स्थानिकांना विश्वासात घेऊन आणि तिथे उभारण्यात येणाऱ्या उद्योग व्यवसायांची माहिती देऊन हे काम केले जाईल असे सांगून मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की,  दै. लोकसत्ताने अतिशय गरजेच्या वेळी या परिसंवादाचे आयोजन केले आहे त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. कोरोनाच्या आजच्या संकट काळात आपण आपले जीवन पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करत असलो तरी आपल्यासमोर यातून अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत त्यापैकी एक रोजीरोटीचे आहे. महाराष्ट्राने या आव्हानाचे संधीत रुपांतर करताना कोरोनाच्या काळातही उद्योग व्यवसायांना दिलासा देण्याचे काम केल्याचे व अनेक नवनवीन उपक्रम सुरु केल्याचे श्री. ठाकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे म्हणाले, आज कोरोनाचा प्रादुर्भाव थोडा कमी झालेला  दिसत असताना आपण हळुहळू काही गोष्टी सुरु केल्या आहेत. हा मधला काळ मागे वळून पाहण्यासाठीचा आहे. आपण काय केले आणि काय केले पाहिजे या धोरणात्मक बाबींच्या निश्चितीसाठी हा वेळ उपयोगी लावला जात असून महाराष्ट्र गुंतवणूकदारांसाठी  ‘आपलेपणा’ची भावना घेऊन पुढे आला आहे. हे राज्य आपल्यापैकी काही जणांची जन्मभूमी आहे पण अनेकांची कर्मभूमीही आहे.  या कर्मभूमीची सुबत्ता वाढवण्याचा विचार प्रत्येकाने करण्याची गरज आहे. त्यांनी महाराष्ट्राला आपलं समजून या राज्यात गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येक उद्योजकाने देश आणि जगाच्या पातळीवर या राज्याचा ‘ब्रॅण्ड ॲम्बेसिडर’ म्हणून काम करावे अशी अपेक्षाही श्री.ठाकरे यांनी व्यक्त केली.

राज्यात उद्योगस्नेही वातावरणाची निर्मिती करण्याला शासनाने प्राधान्य दिल्याचे सांगताना मुख्यमंत्र्यांनी उद्योगांना देण्यात येत असलेल्या सुविधांची तसेच यासंबंधाने घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली. एक खिडकी योजना, उद्योग मित्रांची नियुक्ती, कुशल मनुष्यबळाच्या उपलब्धतेसाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचा त्यांनी उल्लेख केला. उद्योगांना अधिक सोयी सुविधा उपलब्ध करून देणे, वीजेचे दर कमी करणे यासारख्या विषयांवरही शासन काम करत आहे परंतु असे निर्णय घेताना राज्याचा समतोल विकास होईल याकडेही लक्ष द्यावे लागते, सर्वसामान्य नागरिकांसह अनेक क्षेत्रांकडेही लक्ष देणे गरजेचे असते याकडे उपस्थितांचे लक्ष वेधले.

मुख्यमंत्र्यांनी पर्यटनक्षेत्रात अमाप रोजगार संधी दडल्या असल्याचे सांगताना पर्यटनक्षेत्राला आदरातिथ्य उद्योगाचा दर्जा देण्यात आल्याची माहिती दिली. काळाप्रमाणे रोजगाराची अनेक क्षेत्र उदयाला येत असून त्याकडेही लक्ष देण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here