रामवाडी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका

0
117
रामवाडी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका
रामवाडी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका

रामवाडी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका

रत्नागिरी

चिपळूण तालुक्यातील मौजे तनाली रामवाडी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याची वन विभागाने सुखरूप सुटका केली. मंगळवारी सकाळी हा प्रकार घडला. बिबट्याला विहिरीतून बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी एक तासाची कसरत करावी लागली.
रामवाडी येथील प्रभाकर बाबाजी जावळे यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती गावचे सरपंच विजय बोंबले यांनी वनपाल सत्ताप्पा सावंत यांना दिली. ही माहिती मिळताच सहायक वनसंरक्षक प्रियंका लगड, परिक्षेत्र वनाधिकारी सरवर खान, वनपाल सत्ताप्पा सावंत हे आपल्या सहकाऱ्यांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी विहिरीची पाहणी केली. ती ४० फूट खोल होती. त्यात असलेल्या १० फूट खोल पाण्यात बिबट्या असल्याचे आढळून आले. बिबट्या हा भक्ष्याचा पाठलाग करत असताना पहाटेच्यादरम्यान विहिरीत पडला असल्याचा अंदाज आहे. विहिरीमध्ये दोरीच्या साह्याने पिंजरा सोडण्यात आला; परंतु बिबट्या पिंजऱ्यात येत नव्हता. त्याला पिंजऱ्यात आणण्यासाठी वन विभागाच्या बचावपथकाला मोठी कसरत करावी लागली. अखेर एक तासाच्या अथक परिश्रमानंतर बिबट्या पिंजऱ्यात आला. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर कणसे यांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली. दोन वर्षांचा हा बिबट्या सुखरूप असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वन विभागाने त्याची नैसर्गिक अधिवासात सुटका केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here