कोरोनाची दुसरी लाट अजूनही ओसरली नसल्याने १ मे पर्यंत घातलेले निर्बंध १५ मे पर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला असून याबाबतचे आदेश आज जारी करण्यात आले. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काढलेल्या या आदेशात सध्या लागू असलेले निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.रूग्णसंख्येत काही प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले असले तरी अजूनही स्थिती पुर्णतः नियंत्रणात आलेली नाही.
आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. रुग्णालयात बेडस,ऑक्सीजन,औषधे यांचा तुटवडा जाणवतो आहे. त्यामुळे बुधवारी झालेल्या राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत यावर विस्तृत चर्चा झाली तेव्हा बहुतांश मंत्रयांनी लॉकडाउन वाढवावा अशीच सूचना केली होती. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील किमान १५ दिवसांनी तरी हा लॉकडाउन वाढविण्यात येईल असे सूचित केले होते.