सोमवारी महाराष्ट्र विधानसभेच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सभापतींची लवकर निवडणूक, एमपीएससी परीक्षेसाठी समिती स्थापन करणे, मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या मुद्दय़ावरून भाजपच्या आमदारांनी महाविकास आघाडी सरकार सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विधानभवनाच्या पायर्यांवर बसून भाजपचे आमदार घोषणा देत राहिले आणि सुमारे अर्ध्या तासाने सभागृहात दाखल झाले.
या आमदारांनी विधानसभेच्या सभापतींसोबत धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. विधानसभेचे अध्यक्ष भास्कर जाधव यांनी सदर घटनेबद्दल सभागृहात नाराजी व्यक्त केली आणि संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्याचा ठराव मांडला. हा ठराव बहुमताने मंजूर झाला आणि भाजपच्या 12 आमदारांना एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले.त्यांच्यामध्ये पराग अलवानी, राम सतपुते, संजय कुटे, आशीष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, शिरीष पिंगळे, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे आणि किर्तीकुमार भंगडिया यांचा समावेश आहे.