विश्वचषकात पहिल्यांदाच भारताला हरवत पाकिस्तानने नवा इतिहास रचला आहे. पाकिस्तानने भारताला 10 गडी राखून पराभूत केले. हा पाकिस्तानचा मोठा विजय आहे. विश्वचषकात आतापर्यंत पाकिस्तान 12 वेळा भारताविरुद्ध हरला होता. मात्र आज पाकिस्तानने विजय मिळवत भारताच्या विजयाचा रोकॉर्डवर ब्रेक लावला.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानच्या शतकी भागीदारीच्या मदतीने पाकिस्तानने भारताने दिलेले 152 धावांचे लक्ष्य 17.5 षटकांत पूर्ण केले आणि 10 गडी राखून मोठा आणि ऐतिहासिक विजय मिळवला. बाबर आझमने 52 चेंडूंत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 68 धावांची खेळी केली. तर मोहम्मद रिझवान 55 चेंडूत 79 धावा करून नाबाद राहिला. भारताकडून एकाही गोलंदाजाला एकही विकेट मिळवता आली नाही.
पाकिस्तानने भारताविरुद्ध चांगली गोलंदाजी केली आणि भारताच्या अव्वल फळीतील फलंदाजांना लवकर बाद केले. त्यामुळे भारताला योग्य धावसंख्या गाठता आली नाही. शाहिन आफरीदीने पाकिस्तानसाठी शानदार गोलंदाजी केली आणि तीन विकेट घेत 31 धावा दिल्या. विराटने 5 चौकार आणि एका षटकारासह 57 धावा केल्या. पाकिस्तानकडून आफरीदीने 31 धावांत 3, तर हसन अलीने 44 धावांत 2 बळी घेतले.