संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम पालखी महामार्गासाठी एकूण 12 हजार कोटीच्या निधी

0
61
????????????????????????????????????

संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम पालखी महामार्गाची लांबी अनुक्रमे 231 व  130 किलोमीटर इतकी असून यासाठी एकूण 12 हजार कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. या दोन्ही पालखी महामार्गाच्या बाजूला पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी विशेष मार्ग तयार करावा व या महामार्गावर वारकऱ्यांसाठी आवश्यक विविध सोयी-सुविधा निर्माण कराव्यात, असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.

पंढरपूर येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 13 विविध महामार्ग प्रकल्पाच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रिमोटचे कळ दाबून आभासी प्रणालीद्वारे करण्यात आले; त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही आभासी प्रणालीद्वारे उपस्थित होते. तर व्यासपीठावर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक राज्यमंत्री व्ही. के. सिंह, केंद्रीय वाहतूक मंत्रालयाचे सचिव गंगाधर अरमाने, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की, या पालखी महामार्गामुळे या भागातील विकासाला गती मिळण्याबरोबरच दक्षिण भारताशीही चांगला संपर्क निर्माण होणार आहे. या महामार्गाच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांसाठी विशेष मार्ग बनवले जाणार असून या मार्गावर वारकऱ्यांसाठी विविध सोयी-सुविधा निर्माण केल्या जाव्यात. पंढरपूरच्या वारीला अनेक वर्षांची परंपरा असून या ठिकाणी भरणारी यात्रा ही सर्वात मोठी यात्रा आहे. शेकडो वर्षाची गुलामी, नैसर्गिक आपत्तीमध्येही वारी सुरूच होती. आजही अविरत सुरु आहे. या वारीमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नसून ही जगाला समानतेचा संदेश देणारी ही वारी असून या ठिकाणी प्रत्येक वारकरी हा समान असतो असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here