जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर,नर्स व इतर कर्मचाऱ्यांमुळे कोरोनावर मात- उभादांडा येथील 30 वर्षीय कोरोनामुक्त रुग्णाची प्रतिक्रिया

0
96

सिंधुदुर्ग – वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा येथील 30 वर्षीय कोरोनमुक्त रुग्णाला ताप, अशक्तपणा आला होता. फॅमिली डॉक्टरनी न्युमोनिया निदान केले आणि मी जिल्हा रुग्णालयामध्ये आलो. तेथील स्टाफने तत्परता दाखवत आयसीयूमध्ये दाखल करून वेळेवर उपचार सुरु केले. जिल्हा रुग्णालयातील तत्पर उपचारपद्धती आणि समुपदेशन यातून सकारात्मक ऊर्जा मिळून कोरोनावर मी सहज मात करू शकलो, अशी भावना या तरुणाने व्यक्त केली आहे

कामानिमित्त गोव्यात असणारा उभादांडा येथील 30 वर्षीय तरुण घरी आला तोच मुळात ताप अंगात घेऊन ! ताप आल्याने त्यांनी फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेतला. तीन दिवसांची औषधेही घेतली. ताप कमी आल्याने पुन्हा गोवा येथे कामाला गेले. पण, तिथे कामाच्या ठिकाणी काही लक्षणे असलेले लोक काम करत होते. त्यातच यालाही पुन्हा ताप येऊ लागला. कामावर सुट्टी टाकली आणि पुन्हा उभादांडा येथील घरी परतला. तातडीने डॉक्टरांकडे गेले असता डॉक्टरनी एक्सरे करून न्युमोनिया झाल्याचे निदान करून रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. तसेच त्याचवेळी आरटीपीसीआर टेस्टसाठी नमुनाही घेण्यात आला.

कुडाळ येथील एका खासगी रुग्णालयात ते दाखल होण्यासाठी गेले होते. पण, त्यांना दाखल करून घेण्यात आले नाही. त्यामुळे ते थेट जिल्हा रुग्णालयात आले. त्यावेळी त्यांना व्यवस्थित उभेही राहता येत नव्हते. ऑक्सिजन पातळी 74 पर्यंत आली होती. ही सर्व कोरोनाचीच लक्षणे असल्याने त्यांना तताडीने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आणि उपचारांना सुरुवातही केली. वेळेवर मिळालेल्या चांगल्या उपचारांमुळे आज ते कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

कोरोना काळातील रुग्णालयातील आपल्या अनुभवा विषयी बोलताना ते म्हणाले, सुरुवातीस फक्त ताप होता, खोकला, सर्दी अशी कोणतीही लक्षणे नव्हती. पण, ताप असल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने आरटीपीसीआर टेस्ट केली. त्याचा अहवाल येण्यापूर्वीच फॅमिली डॉक्टरनी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिल्यामुळे जिल्हा रुग्णालयामध्ये आलो. त्यावेळी बेड्स मिळण्याची धास्ती होती. पण, जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरनी योग्य ती व्यवस्था करून मला बेड उपलब्ध करून दिला आणि थेट आयसीयूमध्ये दाखल केले. त्यावेळी माझी ऑक्सिजन पातळी 74 वर होती. तर एचआरसीटी स्कोअर 23 इतका होता. 10 दिवस मला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. सुरुवातीस मास्कचा त्रास होत होता. मी तो काढायला पहात होतो. पण, तेथील नर्स मला तसे करू देत नव्हत्या. पूर्णवेळ व्हेंटिलेटर सुरू असायचा त्यामुळे पाणी सुद्धा स्ट्रॉने प्यावे लागत होते. मात्र रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स व इतर कर्मचाऱ्यांनी माझी चांगली देखभाल केली. व्हेंटिलेटरच्या मॉनिटरवर नर्स नियमित लक्ष ठेऊन असे. त्याचे प्रमाण कमी – जास्त करुन व्यवस्थित ऑक्सिजन मिळेल असे पाहिले जात होते. रोज चांगले जेवण मिळत होते. जेवणासोबत दोन्ही वेळा अंडी, सकाळी व संध्याकाळी काढा दिला जात होता. कोरोनामुळे माझ्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागले. याकडे लगेच लक्ष देऊन माझ्या आहारामध्ये बदल करण्यात आला. मानसिकता चांगली रहावी यासाठीही समुपदेशन करण्यात आले. त्यामुळे सकारात्मकता निर्माण होऊन कोरोनावर सहज मात करणे शक्य झाले. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स व नर्सनी केलेले उपचार आणि सहकाऱ्यामुळेच आज मी कोरोना मुक्त होऊन घरी परतलो आहे. जिल्हा रुग्णालयाने मला दिलेल्या जीवदानाबद्दल त्यांना शतशः प्रणाम!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here