सरपंचांनी गावांचे पालक म्हणून जबाबदारी घेण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

0
134

कोरोनाचे संकट आपल्याला लवकरात लवकर संपवायचे आहे. यासाठी ग्रामपंचायत सरपंचांनी आपापले गाव कोरोनामुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा, गावामध्ये कोरोनामुक्तीची लोकचळवळ निर्माण करावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. सरपंचांनी गावांचे पालक म्हणून जबाबदारी घ्यावी. गावात शासनाच्या सूचनांप्रमाणे विविध उपाययोजना राबवून ‘माझे गाव, कोरोनामुक्त गाव’चे ध्येय लवकर साध्य करावे, असे त्यांनी सांगितले.

सर्व जिल्ह्यातील सरपंचांनी त्यांच्या त्यांच्या गावात कोरोनामुक्तीसाठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. आपले गाव कसे कोरोनामुक्त केले याच्या यशोगाथा काही सरपंचांनी सांगितल्या. दुसरी लाट लवकरात लवकर संपवण्याबरोबरच तिसरी लाट गावच्या वेशीवरच थोपवण्यासाठी आवश्यक सर्व उपक्रम राबवू, असा विश्वास तिन्ही विभागातील सरपंचांनी दिली.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, अजूनही कोरोना संपलेला नाही. पहिल्या आणि दुसर्‍या लाटेतील चुकांची पुनरावृत्ती आता होता कामा नये. सारखा सारखा लॉकडाऊन आपल्याला परवडणार नाही. यासाठी सर्व गावांनी आपले गाव, आपला तालुका, आपला जिल्हा आणि त्या माध्यमातून संपूर्ण राज्य कसे कोरोनामुक्त होईल यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. हे काम चळवळीच्या स्वरूपात करावे. जोपर्यंत कोरोना आहे तोपर्यंत गावकरी सर्व प्रतिबंधात्मक नियम पाळतील याची काळजी घ्यावी. गावात कोठेही सभा, समारंभ, लग्नसोहळे, मोर्चे, आंदोलने यासारखी गर्दी जमवणारे कार्यक्रम होणार नाहीत याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

गावात काम करणारे सरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी हेच गावच्या व्यवस्थेच्या पाठकणा आहेत. या सर्वांनी कोरोनामुक्तीसाठी आतापर्यंत भरीव काम केले आहे. आता तिसरी लाट थोपवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन चळवळीच्या स्वरूपात काम करावे आणि कोरोनाला गावातून हद्दपार करावे, असे आवाहन त्यांनी केले.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, पहिली लाट ओसरल्यानंतर आपण थोडेसे गाफील राहिलो. त्यामुळे दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागाला मोठा फटका बसला. आता तिसरी लाट येणार नाही यासाठी सर्व पातळ्यांवर कार्यवाही करणे गरजेचे आहे. लसीकरणाचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. गावातील प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण होईल यासाठी सरपंचांनी पुढाकार घ्यावा. म्युकरमायकोसिसचे नवीन आव्हान आपल्यासमोर आले आहे. यालाही रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा. ठरवले तर गाव कोरोनामुक्त होऊ शकते हे हिवरेबाजारने दाखवून दिले आहे. त्याच धर्तीवर सर्व सरपंचांनी पुढाकार घेऊन आपापले गाव कोरोनामुक्त करावे, असे आवाहन त्यांनी केले.

टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी म्हणाले की, कोरोना अजूनही आहे याची जाणीव ठेवूनच आपल्याला वागावे लागेल. अजूनही अलर्ट, रेड अलर्टवर रहावे लागणार आहे. लोकांनी अजूनही कोरोनाबाबत थोडाही संशय आला तर टेस्ट करून घ्यावी, वेळीच दवाखान्यात दाखल व्हावे. कोणत्याही अफवांना बळी न पडता लसीकरण करून घ्यावे. कोरोना हा छोटासा पण चिवट विषाणू आहे. त्याने आता रूप बदलले आहे. दुसरी लाट अजून गेलेली नाही, तिसरी संभाव्य लाट येण्याची शक्यता आहे. त्यातच पावसाळी आजारही येऊ शकतात. या सर्व पार्श्वभूमीवर आवश्यक काळजी घ्यावी. मास्क हेच सर्वात प्रभावी लसीकरण आहे. जोपर्यंत संपूर्ण लसीकरण होत नाही तोपर्यंत मास्क खाली करू नये, असे आवाहन त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here