‘साहित्य अकादमी’ पुरस्काविजेते साहित्यिक, ज्येष्ठ नाटककार, पत्रकार जयंत पवार यांचे निधन

0
56

 ‘साहित्य अकादमी’ पुरस्कारविजेते साहित्यिक, ज्येष्ठ नाटककार, पत्रकार जयंत पवार यांचे ६१ व्या वर्षी निधन झाले आहे. पवार यांना रात्री अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. जयंत पवार यांच्या निधनाने नाट्य क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात शोककळा पसरली आहे. जयंत पवार यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले असून प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड करणारा, दुर्बल-वंचिताचं जगणं नाटकातून, साहित्यातून जिवंत करणारा सिद्धहस्त लेखक, पुरोगामी, विद्रोही व्यक्तिमत्वं काळाच्या पडद्याआड गेलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, सामाजिक विषयांची आशयघन मांडणी करुन ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांनी नाट्यक्षेत्र समृद्ध केलं. पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक विषय समर्थपणे हाताळले. समाजातील वंचित, दुर्बल घटकांना न्याय देण्यासाठी लेखणीतून प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारलं. जयंत पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या नाट्य, साहित्य, पत्रकारिता क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here