सिंधुदुर्ग:भाताला यावर्षी ​१ हजार ​९६० रुपये हमीभाव मिळणार;आमदार वैभव नाईक यांचा पाठपुरावा

0
114
शासनाचे पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत-एम.के.गावडे

गतवर्षीच्या तुलनेत ९२ रुपयांची वाढ;​ जिल्ह्यात ​३८ भात खरेदी केंद्रे निश्चित

सिंधुदुर्गकिमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत शासनाने ​सन ​२०२१-​२२​ हंगामासाठी भाताला प्रती क्विंटल १ हजार ​९६० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. गतवर्षी भातासाठी १८६८ रु हमीभाव व ७०० रु. बोनस असे एकूण २५६८ रु दर शेतकऱ्यांना देण्यात आला. यावर्षी भाताच्या हमीभावात ९२ रुपयांची वाढ करण्यात आली असून ​१ हजार ​९६० रुपये हमीभाव देण्यात येणार आहे. तसेच यावर्षीही राज्य शासनाकडून अतिरिक्त दिल्या जाणाऱ्या बोनसची रक्कम देखील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. भाताला चांगला हमीभाव मिळावा जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी भात शेतीकडे वळतील यासाठी आमदार वैभव नाईक प्रयत्न करत आले आहेत.त्यांच्या प्रयत्नांना यश येत असून भाताच्या हमीभावात तसेच बोनस रक्कमेत वाढ होऊन शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत आहे.

ज्या शेतकऱ्यांना भाताची विक्री शासकीय खरेदी केंद्रावर करायची आहे, त्या शेतकऱ्यांची खरेदी केंद्रावर आगाऊ ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. या ऑनलाईन नोंदणीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ​३८ ठिकाणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.त्यातील जवळच्या केंद्रावर शेतकऱ्यांनी दि. ​३० सप्टेंबर ​२०२१ रोजीपर्यंत ऑनलाईन नोंदणी करायची आहे.

राज्य शासनाचे अधारभूत किंमत धान खरेदी योजनेकरिता शासनाची मुख्य अभिकर्ता संस्था म्हणून दि.महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन लि. ही संस्था काम पाहते. मार्केंटिंग फेडरेशनच्या जिल्हा का​​र्यालयामार्फत जिल्ह्यात ​३८ ठिकाणी नोंदणी केंद्र सुरू केली असून यामध्ये (​१)सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघामार्फत सावंतवाडी, मळगाव, मळेवाड, तळवडे, डेगवे, कोलगाव, मळेवाड, भेडशी. (​२)कुडाळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघातर्फे कुडाळ, माणगाव, कडावल, कसाल, घोडगे. (​३)शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ लि. कणकवली, (​४)वेंगुर्ला तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि. वेंगुर्ला, (​५) देवगड तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि. देवगड, पडेल, पाटगाव. (​६) मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि. पेंडूर. (​७) वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघ लि. वैभववाडी. (​८) सिंधुदुर्ग जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संघ, लि. ओरोस, कट्टा. (​९) बजाज सिंधुदुर्ग राईस मिल कुडाळ. पिंगुळी, फोंडा, निवजे, आंब्रड, कनेडी, इन्सुली, खारेपाटण, तुळस, हरकुळ खुर्द, हरकुळ बुद्रुक, करुळ, हिर्लोक, पणदूर, चौके, विरण, वेतोरे येथे नोंदणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

सदर धान/भात खरेदी ही शासनाच्या ऑनलाईन पोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी चालू खरीप हंगाम ​२०२१-​२२​ मधील धान (भात) पीक लागवडीची नोंद असलेला डिजिटल स्वाक्षरीचा मुळ सातबारा प्रत, आधार कार्ड व बँक पासबूकची झेरॉक्स सोबत आणणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यानंतर त्यांना एसएमएस द्वारे नोंदणी क्रमांक दिला जाणार आहे.शासनाकडून धान (भात) खरेदीच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे भात विक्रीसाठी बोलवण्यात येणार असून प्रत्यक्ष खरेदीनंतर खरेदी झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर खरेदीची रक्कम वर्ग करण्यात येणार आहे

जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालामार्फत वरील ​३८ ठिकाणी भात विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची नोंदणी करण्याकरिता कळविण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वरिल भात खरेदी केंद्रावर दिनांक​ ३० सप्टेंबर ​२०२१ पर्यंत नोंदणी करून घ्यावी असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.

         

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here