सिंधुदुर्गात आज मुंबई-गोवा महामार्गावर खड्डेमुक्त महामार्गासाठी मानवी साखळीद्वारे जनआंदोलन

0
95

सिंधुदुर्ग – मुंबई-गोवा महामार्ग बनवण्याचे काम गेली १२ वर्ष सुरु आहे. या कामामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले असून प्रवास करणे कठीण झाले आहे. त्याशिवाय जागोजागी उखडलेल्या रस्त्यामुळे प्रवास करताना होणार त्रास हा फक्त तिथला नागरिकच अनुभवू शकतो.

या महामार्गाचे काम लौकर व्हावे म्हणून “समृद्ध कोकण संघटना आणि कोकण महामार्ग समन्वय समितीच्या’ वतीने ५ सप्टेंबरपासून ते ८ सप्टेंबर पर्यंत मानवी साखळीद्वारे जनआंदोलनाचे आयोजन करण्यात येत आहे.महामार्ग बनवणाऱ्या यंत्रणेविरुद्ध निदर्शन करत काळी फित लावून मानवी साखळीच्या माध्यमातून पोलादपूर, चिपळूण, संगमेश्वर, सिंधुदुर्ग, पनवेल आणि पळस्पे येथे सकाळी १० ते दुपारी १२ दरम्यान आंदोलन करण्यात येईल. या संदर्भात शनिवारी दुपारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषद झाली. यावेळी राज्याचे माजी मुख्य सचिव द.म. सुकथनकर,समृद्ध कोकण संघटनेचे संस्थापक संजय यादवराव आणि कोकण भूमी प्रतिष्ठानचे दीपक परब, पियुष बोंगिरवार उपस्थित होते.

पुढील एक वर्षात दर्जेदार आणि खड्डेमुक्त महामार्ग पूर्ण व्हावा. शाळा, गावे अशा ठिकाणी अंडरपासची सोय करावी. अपघातासाठी कारणीभूत असणारी धोकादायक वळणे, घाट शक्य तितके सोपे करावेत. जेएनपीटी, दिघी, औद्योगिक पट्टा असणाऱ्या पनवेल ते माणगाव या रस्त्याला सहापदरी करत संपूर्ण सिमेंट रस्ता बनवावा, संपूर्ण सर्व्हिस रोड असावा. महामार्गाचे काम पूर्ण झाल्याशिवाय टोल आकारू नये.डोंगर पोखरण्याऐवजी भरावासाठी नदीतील गाळ महामार्गाच्या कामासाठी वापरावा. महामार्गावर विविध झाडे लावत हा देशातील सुंदर ग्रीन हायवे बनवावा. दर २५ किलोमीटरवर शेतकरी बाजाराची सुविधा करावी अशा विविध मागण्या या आंदोलनात मागण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here