सिंधुदुर्गनगरी – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा हा रेड झोनमध्ये आहे.यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील सर्वच कोविड केअर सेंटरमधील कोरोना बाधित रुग्णाच्या नातेवाईकांना भेटण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार कोरोना काळजी केंद्रामधील बाधित रुग्णांना भेटण्यास नातेवाईकांना प्रतिबंध करण्यात आले आहे. या निर्णयास सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी केले आहे. नातेवाईकांच्या कोविड वॉर्डमधील प्रवेशामुळे ते कोरोना संक्रमणाचे वाहक बनत आहेत. सर्व शासकीय कोविड सेन्टरमध्ये रुग्णांची आपुलकीने काळजी घेतली जात आहे. त्यांच्या खाण्या-पिण्याच्या गोष्टींचीही व्यवस्थित काळजी घेतली जात आहे. त्याशिवाय रुग्णांच्या प्रकृतीविषयीची माहितीही घरच्यांना फोन करून सांगितली जात आहे.
या निर्णयास सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी केले आहे. तरी या नियमांचे पालन न केल्यास पोलीस प्रशासनामार्फत रुग्णालयाच्या आवारात फिरणाऱ्या नातेवाईकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यात देण्यात आला आहे