सिंधुदुर्ग जिल्हा रेड झोन; कुडाळ तालुका रेड झोन

0
88

सावधान माझे आंदुर्लेगाव २० एप्रिल २०२० पासून जवळपास ७० पेशंट पाॅझीटीव आजपर्यंत ..एकाच दिवशी ७ , ९, ११ असेही पेशंट वाढले होते. अजूनही संख्या वाढतच आहे. गावात दुर्दैवाने मृत्यू पण झाले आहेत.

     पेशंट वाढायला  बरिच कारणं आहेत त्यापैकी बेफिकिरी हे पण एक कारण आहेच. मागच्या वर्षी आपण कोरोनापेक्षा पोलिसांना घाबरुन ब-यापैकी  लॉक डाऊनचे नियम  पाळत होतो. पण यंदा हे सगळं  फुकट गेलं असं वाटतं. गेल्या वर्षी एवढी गरज नसताना नियमांची अंमलबजावणी प्रशासनाकडून आणि नागरिकांकडून होत होती.यंदा गरज असून बेफिकिरी वाढली आहे.

लक्षणं दिसत असूनही…खय काय नाय..जरा डोक्या जड आसा.. काय नाय वायच सर्दी…, वायच खोकलो,.. जरासो ताप..आणि सगळं अंगावरच तोलतात.
आणि वर म्हणतात..काय नाय पूर्वी मोडा म्हणत त्याका आणि आता ह्यो कोरोना. अरे , पण पूर्वीचा कोरोना पुफ्फुसांपर्यंत जावून व्हेंटीलेटर लावावा लागत नव्हता, बेड मिळत होते. अशातच पेशंट गेला तर पीपीइ किट घालून स्मशानात जावं लागत नव्हतं. लक्षणं दिसली कि लोक वेगळ्या नजरेनं बघत नव्हते. सांगताना काय वाटत नसतं परंतु पॉझिटीव्ह आल्यावर जे भोगावं लागतं तेव्हा खूप त्रास होतो. स्वतःला आणि कुटुंबियानासुद्धा. मग सगळेच तोटे सुरु..

लक्षणं दिसली तरी टेस्टिंग करायलापण तयार होत नाहीत. आपले आरोग्य सेवक/सेविका घरोघरी जाऊन सांगत असून सुद्धा ऐकत नाहीत. मोफत असूनही Rapid antigen किंवा RT PCR test करायला पण बघत नाहीत. लक्षण दिसली तर जरा स्वतःच विलगीकरणात रहा. स्वतःला कोविड पेशंट समजा आणि आपल्या कुटुंबाची अगोदर काळजी घ्या. तसं राहून उपचार केल्यास इतर कुटुंबियांना पण धोका नसेल याची खात्री बाळगा.

असे लक्षणं असलेले …पण आमका काय जावक नाय म्हणणारेच हे लोक रेड झोनसाठी जास्त कारणीभूत आहेत. बरं positive आलेले व होम आयसोलेशनमध्ये असलेले सुद्धा घरात थांबण्यापलिकडे मिरगाची कामं करणे, लाकडा भरणे, वाहने धुणे ही कामं मागं घालण्यात व्यस्त. संडास, बाथरुम एकच वापरतात. आणि घरातली इतर माणसं बाहेर फिरतात. एवढंही का समजू नये या लोकांना? थोडे दिवस थांबा ना घरी. .

ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, आशाताई खरोखरच उत्तम काम करत आहेत. त्यांना साथ द्या. ग्रामस्थांची पण जबाबदारी आहे ना? मास्क लावायला पण आळस का? मास्क लावा आणि सुरक्षित अंतर ठेवा. गर्दी टाळा.

आता आपली शेतीची कामं सुरु होणार. बेफिकिरीमुळे घरात पॉझिटीव्ह मिळाले तर शेतीची कामं करायला कामगार पण मिळाले पाहिजेत याची काळजी घ्या. पावसात भिजू नका. आहार चांगला घ्या.

व्हेंटीलेटर लावण्यापेक्षा मास्क लावणं चांगलं,
हॉस्पिटलमध्ये राहण्यापेक्षा घरात राहणं चांगलं, सोशल डिस्टन्स पाळणंं चांगलं..,गर्दीत अजिबात जाऊ नका.
आणि अशी काळजी घेणं हे नंतरचे उपचार करण्यापेक्षा चांगलं.
गावातल्या दुकानात सुद्धा विनाकारण गर्दी असते. सध्या आपले आणि इतरांचे जीव वाचवण्यासाठी सहकार्य करा.
सध्याच तालुक्यात आणि जिल्ह्यात बेड मिळणं कठिण झालय. परिस्थिती कठिण आहे. विचार करा . वेळीच सावध व्हा. इतरानाही सावध करा. आपण मानसिकता सुधारली तरच ही परिस्थिती सुधरु शकते.

हे आमका काय शिकवतले. आणि आमका कायएक जावचा नाय. या भ्रमातून प्रत्येकाने बाहेर येणे गरजेचे आहे. जिल्ह्यात रोज ६०० च्या आसपास पॉझिटीव्ह मिळत आहेत. 4500 हजार अॕक्टीव्ह पेशंट आहेत. स्वतः सावध व्हा. इतरांना सावध करा. पुढे शेती आहे, गणेश चतुर्थीसारखे सण आहेत. वातावरण आनंदी राहू दे.

डॉ. दिपक ठाकूर यांनी सांगितलंय आंदुर्लेतील नागरिकांनी २ मास्क लावणं हिताचं आहे. त्यांच्याकडे तपासायला जाणाऱ्या प्रत्येक पेशंटला ते सांगतात बरं वाटेपर्यंत बाहेर फिरु नका. इतरांच्या आरोग्यासाठी जबाबदारीने घरातच थांबा. हे पण ऐकलं पाहिजे.

आता सौम्य लक्षणं असलेल्या पॉझिटीव्ह आलेल्या पेशंटना साखळी तोडण्यासाठी शाळेमध्ये व्यवस्था करायचा शासनाचा आदेश आहे. कारण हे लोक कुटुंबातच राहतात आणि कुटुंबिय बाहेर फिरतात. या सगळ्या गोष्टींचा विचार करुन काळजी घ्या. सुरक्षित रहा.

संतोष पाटील.
ग्रा.प.सदस्य तथा
कोरोना नियंत्रण समिती सदस्य.
9422041002.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here