सिंधुदुर्ग- सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपाचा शिवसेनेला धोबीपछाड

0
75

सिंधुदुर्ग- अभिमन्यू वेंगुर्लेकर


सिंधुदुर्ग- संपूर्ण राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या आणि राणे विरुद्ध शिवसेना व महाविकास आघाडी अशा झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत निवडणुकीचा निकाल आता स्पष्ट झाला आहे. वादविवाद, मारहाण प्रकरण आणि कोर्टकचेरी यामुळे गाजलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत नारायण राणेंच्या नेतृत्वाखालील भाजपाने शिवसेनेला धोबीपछाड दिला आहे. १९ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीच्या आतापर्यंत समोर आलेल्या या निकालांमध्ये भाजपा पुरस्कृत सिद्धिविनायक सहकार पॅनेलला ११ जागांवर विजय मिळवला आहे. तर शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या खात्यात ८ जागा गेल्या आहेत.


सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक झाल्यानंतर सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण तापले होते. त्यातच सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असलेल्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे जिल्ह्यातील परिस्थिती अधिकच संवेदनशील झाली होती. या हल्ला प्रकरणात भाजपा आमदार नितेश राणे यांच्यावरही आरोप झाले. तसेच त्यांचा जामीन अर्जही कोर्टाने फेटाळला आहे, अशा वातावरणात झालेल्या या निवडणुकीत भाजपा पुरस्कृत सिद्धिविनायक सहकार पॅनेलने बाजी मारली. या पॅनेलमधून, विठ्ठल देसाई, महेश सारंग, मनीष दळवी, दिलीप रावराणे, अतुल काळसेकर, बाबा परब, प्रकाश बोडस हे उमेदवार विजयी झाले आहेत.


दरम्यान, या मतमोजणीत शिवसेना आणि महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज उमेदवार पराभूत झाले. त्यामध्ये शिवसेना नेते आणि विद्यमान जिल्हा सहकारी बँक अध्यक्ष सतीश सावंत यांना पराभवाचा धक्का बसला आहे. मतमोजणीमध्ये समसमान मतं पडल्यानंतर ईश्वर चिठ्ठीद्वारे करण्यात आलेल्या निवडीमध्ये भाजपा पुरस्कृत पॅनेलचे उमेदवार विठ्ठल देसाई यांनी सतीश सावंत यांचा पराभव केला आहे. दोन्ही उमेदवारांना समसमान मते मिळाली. अखेर या लढतीचा निकाल ईश्वरचिठ्ठीद्वारे लागला. त्यामध्ये विठ्ठल देसाई यांनी बाजी मारली. तर भाजपाचे ज्येष्ठ नेते राजन तेली यांचाही या निवडणुकीत पराभव झाला. पतसंस्था मतदार संघातून भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली विरुद्ध शिवसेना नगरसेवक सुशांत नाईक यांच्यात झालेल्या लढतीत सुशांत नाईक यांनी राजन तेलींचा पराभव केला आहे. अंतिम निकालांमध्ये भाजपा पुरस्कृत पॅनेलला ११ तर महाविकास आघाडीच्या पॅनेलला ८ जागा मिळाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here