स्थानिक उद्योगांना पूरक असणारे रोजगारभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात आज शासकीय तंत्र निकेतन, शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय, शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालय आणि शासकीय विज्ञान संस्थेची आढावा बैठक पार पडली. यावेळी श्री.सामंत बोलत होते.
बैठकीस रोजगार हमी, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, आमदार अंबादास दानवे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक एम.डी.शिवणकर, शासकीय तंत्र निकेतनचे प्राचार्य एफ.ए.खान, शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.के.मौर्य, शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य आर.एच.सातपुते, शासकीय न्याय सहायक विज्ञान संस्थेचे प्रभारी संचालक सतीश देशपांडे आदी उपस्थित होते.
श्री.सामंत म्हणाले की, औरंगाबाद ही औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाते. या शहरात अनेक उद्योग आहेत. या उद्योगांना आवश्यकतेनुसार तंत्रज्ञानाने प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज भासते. असे मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी तंत्र शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी स्थानिक औद्योगिक वसाहतींना भेट द्यावी. उद्योजकांची बैठक घेऊन त्यांना लागणारे प्रशिक्षीत मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी त्या प्रकारचे अभ्यासक्रम महाविद्यालयात सुरू करावेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या प्रसिध्द यादीमधील अल्पकालीन अभ्यासक्रम सुरू करण्याची सूचनाही त्यांनी केली.
श्री.सामंत यांनी यावेळी सदर महाविद्यालयांच्या कामकाजांचा आढावा घेतला. नवीन प्रवेश व नवीन अभ्यासक्रम याबाबतची माहिती त्यांनी जाणून घेतली. त्याचप्रमाणे महाविद्यालयांच्या अडचणीही जाणून घेतल्या. उत्कृष्ट कुलगुरू म्हणून निवड झाल्याबद्दल डॉ. प्रमोद येवले यांचा यावेळी श्री.सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.