स्वीस बँकेने गुरूवारी आपला वर्षिक अहवाल जाहीर केला. त्यात भारतीयांची जमा रक्कम 20 हजार कोटींच्या वर गेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे एका वर्षात या पैशांमध्ये 286 टक्के म्हणजे सुमारे 14 हजार कोटींची वाढ झाली आहे. 2019 मध्ये स्वीस बँकेत भारतीयांचे 6,628 कोटी होते. ते आता 20 हजार कोटींच्या वर गेले आहेत. 2007 नंतर 13 वर्षांतील ही सर्वात जास्त वाढ आहे. दरम्यान, स्वीस बँकेतील भारतीयांच्या काळ्या पैशात मोठी वाढ झाल्याचा आरोप केंद्र सरकारने फेटाळला आहे. याबाबत बँकेकडून माहिती मागवली असल्याचे सरकारने म्हटले आहे.
स्वित्झर्लंडच्या मुख्य बँकेने गुरुवारी बँकेतील जमा रकमेचा वार्षिक अहवाल जाहीर केला. त्यानुसार भारतीयांच्या या बँकेतील ठेवींमध्ये वर्षभरात 286 टक्क्यांची वाढ होऊन त्या 20 हजार 700 कोटी झाल्या आहेत. त्यावरून काँग्रेसने मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे. याबाबत केंद्र सरकारने श्वेत पत्रिका काढावी आणि कोणत्या संस्था व व्यक्तींचे किती पैसे आहेत ते जाहीर करावे, अशी मागणी केली आहे.
विदेशी बँकांमधील काळा पैसा परत आणण्यासाठी सरकारने काय पावले उचलली याची माहिती द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी केली आहे. सत्तेवर येण्यापूर्वी काळा पैसा भरतात परत आणू आणि प्रत्येक भारतीयाच्या खात्यात 15-15 लाख जमा करू असे भाजपने सांगितले होते. त्याचे काय झाले, असाही सवाल त्यांनी केला आहे. दरम्यान, स्वीस बँकेतील जमा रकमेच्या माहितीचा हा कथित अहवालच केंद्र सरकारने फेटाळला आहे. याबाबत स्वीस बँकेच्या अधिकार्यांकडून आम्ही माहिती घेत आहोत, असे केंद्रीय अर्थमंत्रालयाने म्हटले आहे.