भारतात प्रथमच हैदराबादच्या नेहरू ज्युऑलॉजिकल पार्कमधील ८ आशियाई सिंहांना कोरोनाची लागण झाली आहे. या आठही सिंहांची rt-pcr चाचणी केल्यानंतर या सिंहांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. जगात इतर ठिकाणी प्राण्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे यापूर्वी आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर प्राणीसंग्रहालय पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहे.
सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी इन्स्टिट्यूट या सिंहांच्या नमुन्यांची जीनोम सिक्वेन्सिंग पद्धतीने विस्तृत तपासणी करणार आहे. त्यामुळे या सिंहांना माणसांपासून कोरोनाचा संसर्ग झाला का? याचा तपास केला जाणार आहे. या इन्स्टिट्यूटने प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचा सांगितले आहे. “द हिंदू” या वर्तमानपत्राने ८ सिंहांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी दिली आहे.