सिंधुदुर्ग – अभिमन्यू वेंगुर्लेकर .
सावंतवाडी- रत्नागिरी येथून नापत्ता असलेल्या विवाहित महिलेला होमगार्डच्या सतर्कतेमुळे सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेत तिच्या पतीच्या स्वाधीन केले. जनशताब्दी एक्सप्रेसने ती सावंतवाडी मळगाव रेल्वे स्टेशन येथे उतरली होती. अनिकेत राऊळ असे या होमगार्ड चे नाव असून त्याच्या या कर्तव्य दक्षतेबाबत पोलिसांनी त्याचे कौतुक केले.
रत्नागिरी येथील एक विवाहित महिला गुरुवारी कोणालाही न सांगता घरातून निघून गेली होती. काही किरकोळ वादामुळे तिने घराबाहेर पडत थेट रत्नागिरी रेल्वे स्टेशन गाठले व जनशताब्दी एक्स्प्रेसने शुक्रवारी सकाळी ती महिला सावंतवाडी मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात उतरली. त्या ठिकाणी संशयास्पदरित्या फिरत असताना तेथे ड्युटीवर असलेल्या होमगार्ड अनिकेत राऊळ यांच्या नजरेस ही महिला आली असता त्यांनी विचारणा करीत सर्व माहिती जाणून घेतली.
त्यानंतर या महिलेबाबत होमगार्ड राऊळ याने सतर्कता दाखवत तातडीने सावंतवाडी पोलीस ठाण्यात कल्पना दिली. अखेर पोलिसांनी रत्नागिरी येथे या महिलेबाबत माहिती तपासली असता पतीने रत्नागिरी पोलीस ठाण्यात नापत्ता दाखल केल्याची माहिती सावंतवाडी पोलिसांना मिळाली. त्यानंतर सावंतवाडी पोलिसांनी तातडीने रत्नागिरी पोलीसांशी संपर्क साधत ही नापत्ता महिला आपल्या हद्दीत आढळून आल्याची माहिती दिली. त्यानुसार त्या विवाहित महिलेचा पती व नातेवाईकांनी सायंकाळी सावंतवाडी पोलिस ठाणे गाठले व सर्व प्रकारची खात्री केल्यानंतर त्या महिलेला पतीच्या ताब्यात देण्यात आले.दरम्यान, सेवा बजावत असताना कर्तव्यदक्षता दाखविलेबाबत होमगार्ड अनिकेत राऊळ याचे सावंतवाडी पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी अभिनंदन केले.