मुंबई : राज्यामध्ये यापुढे इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यात येणार असून २०२४ पर्यंत मुंबईतील ५० टक्के बसेस या इलेक्ट्रिक असतील, असे राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तसेच मुंबईमध्ये एक हजार ९०० नव्या इलेक्ट्रिक बसेस सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्यामुळे राज्यात ई वाहनांना चालना देण्यात येणार असून चार्जिंग स्टेशन्स वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. काही दशकांपूर्वी केवळ एक संकल्पना वाटणा-या इलेक्ट्रिक गाड्या आता ब-यापैकी सर्वसामान्य झाल्या आहेत. सध्याच्या काळात इलेक्ट्रिफाइड वाहतुकीकडे वाटचाल ही जास्तीत जास्त अपरिहार्य होत चालली आहे. इलेक्ट्रिक वाहने ही खूप उत्तम निवड आहे. विशेषत: आपण ज्या वातावरणात राहतो, त्यासाठी आणि सभोवतालच्या लोकांसाठी ती महत्त्वाची आहे. येणा-या काळात वाहतूक हे एक मोठे शाश्वत आव्हान आहे, असेही ते म्हणाले.
सध्या भारतीय बाजारात ई-वाहनांचा बोलबाला आहे. तसेच ई वाहनांबद्दल खूप चर्चा ऐकायला मिळत आहे. अनेक मोठ्या दुचाकी आणि चारचाकी निर्मिती करणा-या कंपन्यांनी त्यांची ई वाहनं बाजारातही आणली आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीने या वाहनांना भविष्यात खूप महत्त्व येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने ईव्हीची पॉलिसी देखील तयार केली आहे