भिवंडी, प्रतिनिधी : भिवंडी रोड रेल्वे स्थानकाजवळील अंजुर फाटा परिसरातील नागरिकांसाठी दिलासादायक ठरलेला आधुनिक रेल्वे अंडरपास अखेर सेवेत दाखल झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे रुळ ओलांडून प्रवास करताना नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत होता. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन करण्यात आलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास आला आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उभारण्यात आलेला हा अंडरपास पूर्णपणे वॉटरप्रूफ असून पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत हे काम पूर्ण करण्यात आले असून त्यामुळे परिसरातील हजारो नागरिकांची सुरक्षित आणि सुलभ वाहतूक सुनिश्चित झाली आहे.
याप्रसंगी रेल्वे प्रशासन, संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी भिवंडी रोड स्थानकावर लोकल गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्याची मागणीही यावेळी केली.