अंबरनाथमध्ये काँग्रेसला धक्का
निलंबनानंतर १२ नगरसेवकांचा थेट भाजप प्रवेश
अंबरनाथ l नवी मुंबई : अंबरनाथमध्ये भाजपासोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेसकडून निलंबित करण्यात आलेल्या १२ नगरसेवकांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकत थेट भाजपामध्ये प्रवेश केला आहे. या घडामोडीमुळे अंबरनाथच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
नवी मुंबई येथे आयोजित एका कार्यक्रमात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत या सर्व नगरसेवकांनी अधिकृतरित्या भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपाचा झेंडा हाती घेत त्यांनी पक्षात सामील होत नव्या राजकीय वाटचालीला सुरुवात केली.
काँग्रेस नेतृत्वाने भाजपासोबत आघाडी केल्याच्या निर्णयावरून संबंधित नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई केली होती. मात्र या कारवाईनंतर या नगरसेवकांनी काँग्रेसमध्ये राहण्याऐवजी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे आणि सत्तेची गणिते पाहता हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
या प्रवेशामुळे अंबरनाथमधील काँग्रेसची ताकद कमी झाली असून भाजप अधिक बळकट झाल्याचे चित्र दिसत आहे. आगामी स्थानिक राजकारणावर या प्रवेशाचा नेमका काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


