अंबरनाथमध्ये भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार, सुरक्षारक्षक जखमी

0
101
अंबरनाथमध्ये भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार, सुरक्षारक्षक जखमी
अंबरनाथमध्ये भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार, सुरक्षारक्षक जखमी

अंबरनाथमध्ये भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार, सुरक्षारक्षक जखमी

अंबरनाथ
अंबरनाथ पश्चिमेकडील नवीन भेंडी पाडा परिसरात बुधवारी मध्यरात्री घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण ठाणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी तोंडाला मास्क आणि डोक्याला हेल्मेट घालून थेट भाजप उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात कार्यालयाबाहेर तैनात असलेला सुरक्षारक्षक जखमी झाला असून संपूर्ण गोळीबाराचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेमुळे निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.बुधवारी रात्री साधारण एक वाजण्याच्या सुमारास भाजपा उमेदवार पवन वाळेकर हे आपल्या कार्यालयात कार्यकर्त्यांसोबत बैठक घेत होते. त्याचवेळी अचानक दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी कार्यालयाच्या दिशेने चार राऊंड फायर केले.
गोळीबाराचा आवाज होताच परिसरात भीतीचे वातावरण पसरले. कार्यालयाच्या काचेवर गोळी लागल्यानंतर आवाज ऐकून सुरक्षारक्षक बाहेर आला. मात्र त्याच्यावरही हल्लेखोरांनी गोळीबार केला. यात सुरक्षारक्षक जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.ही संपूर्ण घटना कार्यालयात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन हल्लेखोर दुचाकीवर येताना, काही क्षण थांबून गोळीबार करताना आणि त्यानंतर घटनास्थळावरून फरार होताना दिसून येत आहेत. प्राथमिक तपासात हा गोळीबार कोणत्याही वैयक्तिक वादातून नसून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पोलीस ठाण्याचे अधिकारी, बदलापूर पोलीस तसेच गुन्हे शाखेचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले आहे. अंबरनाथ पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.या घटनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, कारण याच दिवशी अंबरनाथमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर घडलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे सुरक्षेच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
निवडणुकीच्या काळात अशा प्रकारच्या हिंसक घटनांमुळे शांततेने पार पडणाऱ्या लोकशाही प्रक्रियेला गालबोट लागत असल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त केली जात आहे.दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून योग्य ती दखल घेतली जात नसल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी भाजपाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. संशयित आरोपींची नावे सांगूनही पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचा आरोप भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केला आहे. या घटनेमागे कोण आहे, याचा सखोल तपास व्हावा आणि आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.दरम्यान, आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेची विशेष पथके अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात रवाना करण्यात आली असून सर्व शक्यता तपासल्या जात असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल, असा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे.या गोळीबाराच्या घटनेमुळे अंबरनाथ परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून निवडणूक काळात वाढणाऱ्या गुन्हेगारी घटनांबाबत नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. आता पोलीस प्रशासन या प्रकरणात किती तत्परतेने आणि पारदर्शकपणे कारवाई करते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here